38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांच्या ५० वर्षांच्या सांगितिक कारकिर्दीचा सन्मान
महाराष्ट्र

ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांच्या ५० वर्षांच्या सांगितिक कारकिर्दीचा सन्मान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गीताचे शब्द जितके खरे तितकेच त्याला लाभलेले संगीतही अजरामर. त्या सूरांची जादू आजही अवघ्या संगीत दुनियेवर कायम आहे, अन् ते संगीताचे जादूगार म्हणजेच ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे. संगीताचं वातावरण घरातच असल्याने, लहानपणापासून कानावर उत्कृष्ट संगीत पडत असे. अगदी लोकसंगीत, नाट्यसंगीतापासून ते सुगम संगीतापर्यंत. कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय शिक्षण वा तालिम न घेता स्वतःच्या अंगीभूत कलेच्या व गुणांच्या बळावर अन् अविरत तपश्चर्येवर त्यांनी संगीताची एक स्वतंत्र बखरच लिहीली.

लोककलेचा पूर्वापार इतिहास तपासून पाहिला तर, लोकसंस्कृती हे मानवी जीवनाच्या जगण्याचे साधन होते. विरंगुळा म्हणून अविष्कार सादर करायचा आणि आत्मिक आनंद मिळवायचा असे काही दशकांपूर्वी त्याचे स्वरूप होते. पुढे माणसाची जीवनशैली बदलली आणि हीच लोकसंस्कृती त्यांच्या मनोरंजनाचे साधन झाले. आता मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत म्हणताना लोकसंस्कृतीचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले आहे. ‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेच्या वतीने “लोकरंग महोत्सव २०२२” चे शानदार आयोजन दामोदर नाट्यगृह, परळ येथे करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (परळ मठ) यांनी विशेष सहकार्य केलेल्या याच कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांच्या ५० वर्षांच्या सांगितिक कारकिर्दीचा मागोवा घेण्यात आला. त्याच निमित्ताने मान्यवरांच्या आणि आयोजकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांना बोलतं करण्याची जबाबदारी कार्यक्रमाचे संवादक डॉ. जितेंद्र जाधव यांनी अगदी चोख बजावली. सदर कार्यक्रमाची संकल्पना सायली परब यांची होती. कार्यक्रमाचं दिग्दर्शन आणि संगीत संयोजन मनोहर गोलांबरे यांनी केलं होतं. नृत्य दिग्दर्शन अमित घरत यांनी केलं होतं. तर कार्यक्रमासाठी साजेसं नेपथ्य, प्रकाश योजना सुनील देवळेकर यांनी केली होती.

देवदत्त साबळे यांची ओळख एकेकाळी ‘शाहीर साबळे यांचा मुलगा’ अशी होती. परंतु मेहनतीने ही ओळख पुसत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. एक संगीतकार म्हणून त्यांनी आपले एक आगळे स्थान निर्माण केले आहे. ‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही त्यांनी पदवीच्या दुसर्‍या वर्षात असताना संगीतबद्ध केलेली गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. गायक जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील ही गाणी आजच्या पिढीतही तेवढीच लोकप्रिय आहेत. किंबहुना मराठी वाद्यवृंद आणि गाण्यांच्या भेंड्या या दोन गाण्यांखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि एचएमव्ही यांच्यासोबत त्यांनी केलेल्या पहिल्या ध्वनीमुद्रणाचा किस्सा ऐकताना सभागृहात कित्येकांच्या पापण्या ओलावल्या होत्या. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्या कार्यक्रमातून नाट्य-चित्रपट सृष्टीला आज नावारूपाला आलेले कलाकार लाभले. सुषमा देशपांडे यांचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना असणाऱ्या ‘बया दार उघड’ या कार्यक्रमाचे संगीतही देवदत्त साबळे यांचे होते. त्यांचा संगीतकार म्हणून झालेला आजवरचा प्रवास रसिकांसमोर उलगडत होता. सोबतच गीत, संगीत आणि लोकनृत्याच्या तालावर ठेका धरत सभागृहातल्या रसिकांच्या माना डोलावत होता.

संगीतकार म्हणून आजवरच्या वाटचालीत आलेले अनुभव आणि ‘ही चाल तुरुतुरु’ व ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही गाणी संगीतबद्ध करतानाच्या आठवणी, वडिलांकडून मिळालेली शिदोरी, नाटक, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील कामाचा अनुभव आज मी रसिकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही साबळे म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव, विश्वस्त अशोक सावंत, मानद विश्वस्त बाळा खोपडे, कलावंत विश्वस्त राजू शेरवाडे, विश्वस्त सुनील हळुरकर, कार्यकारी विश्वस्त संतोष परब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (परळ मठ) यांनी विशेष आयोजन सहकार्य केले. मठाचे अध्यक्ष सचिन शेट्ये तसेच समाजसेवक दिलीप धुरी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

Related posts

दोनशे बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार

Bundeli Khabar

आरोग्य समस्या व निराकरण या विषयावर चर्चासत्र

Bundeli Khabar

द्वारिकामाई चैरिटी संस्था द्वारा ‘भिक्षा नही शिक्षा’ अभियान की पहल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!