35.8 C
Madhya Pradesh
May 2, 2024
Bundeli Khabar
Home » तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर – लेखिका मंदाकिनी भट
महाराष्ट्र

तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर – लेखिका मंदाकिनी भट

*पुस्तक परिचय – कृपया प्रसिद्धीसाठी*

*तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर – लेखिका मंदाकिनी भट*

तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर हे लेखिका मंदाकिनी भट यांनी लिहिलेले पुस्तक हातात धरून, वाचून ते पूर्ण करता येणे शक्य आहे. साने लहान परि परिणामी थोर असे हे पुस्तक आहे. नावही सार्थ तेजोभास्कर. पण मनात प्रश्न येतो, आतापावेतो कोणीही यावर का बरे लिहिले नाही, या विषयावर का बरे लिखाण झाले नसावे, पण याची उणीव मंदाकिनीताईंनी हे पुस्तक लिहून पूर्ण केली. मराठी साहित्यसंपदेत या पुस्तकाने मोलाची भर घातली हे निश्चित.

लेखिका मनोगतात म्हणते की, बाबाराव, तात्याराव आणि डॉ. नारायण तथा बाळ सावरकर यांना जन्म देणा-या राधाबाई आणि दामोदरपंत यांच्याबद्दल अत्यंत त्रोटक माहिती वाचनात आली. राधाबाई आणि दामोदरपंत यांच्याबद्दल लिहिले पाहिजे. ही उर्मी लेखिकेला स्वस्थ बसू देत नव्हती. तेव्हा जी काही थोडी साधने उपलब्ध होती. त्यांच्या आधारे दामोदरपंत आणि राधाबाई यांचे जीवन लेखिकेने समजून घेतले. आई-वडिलांचे गुणविशेष मुलांमध्ये कसे उतरले आणि संस्कारित झाले हे या पुस्तकातून उत्तमरित्या लिहिले आहे. इतिहासाचे पहिले गहाळ होऊ पाहणारे पान शोधून त्यावर नवीन प्रकाश टाकला आहे.

आई राधाबाई निवर्तल्यानंतर वडिलांनी म्हणजे दामोदरपंतांनी आई जी जी कामे करते, ती स्वतः सर्व करून आईची उणीव मुलांना जाणवू दिली नाही. सावत्र आईचा जाच नको म्हणून वय लहान असतानाही दुसरे लग्न केले नाही. वडिलांचा त्याग, प्रेम, शिस्त आणि संस्कार यामुळे तिघा बंधूंनी देशासाठी अलौकिक कार्य केले. नाशिकच्या टिंगलखोरांनी ग्रंथकीटक म्हणून विनायकाची संभावना केली असली तरी पुढे याच ग्रंथकीटकाने साहित्य सम्राट म्हणून नाव गाजविले. साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविले आणि ६ हजार पेक्षा जास्त पृष्ठांची ग्रंथरचना केली. तपकिरीचा नत्स्य म्हणून कसा उपयोग करून घेतला इ. गोष्टी लेखिकेने उत्कृष्टपणे लिहिल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.

राधाबाई दामोदरपंत यांची एकुलती एक मुलगी, तिन्ही राष्ट्रभक्त सावरकर बंधूंची एकमेव भगिनी मैनाताई काळे, विवाहानंतर माई म्हणून परिचित झाल्या. त्यांच्यासंबंधींचीही माहिती आपल्याला वाचायला मिळते. सावरकरांना एक बहिण होती हेच पुष्कळ लोकांना माहीत नाही. त्याचप्रमाणे बापूकाका (दामोदरपंतांचे बंधू), सावरकर कुटुंबातील जावा, त्यांचे पतीच्या देशकार्यातील योगदान, त्यांचा त्याग व कष्ट यांचीही माहिती या पुस्तकात आहे. मुद्रणदोष थोडेसे आहेत. पण मुखपृष्ठ सुंदर रेखाटले आहे.

शीर्षकही समर्पक आहे. एकूणच तेजोभास्कर अशा दामोदरपंतांचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल, ध्येयवेड्या तरुणांनी वाचकांनी यातून प्रेरणा घेऊन यावर अधिक संशोधन करून पुढे लिहिले तरी लेखिकेला हे श्रम सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल.

सावरकर घराणे आणि सावरकर बंधूंचे आई-वडिल दामोदरपंत व राधाबाई यांचेविषयी आणि भगूरच्या वाड्यात त्यांनी मुलांवर केलेले संस्कार तसेच त्यातून फुलत गेलेली देशभक्ती यांचे उत्तम चित्रण म्हणजे मंदाकिनी भट लिखित तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर हे पुस्तक होय.

– तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर
लेखिका श्रीमती मंदाकिनी भट
भ्रमणध्वनी ९९३०३०३५९६
प्रथमावृत्ती २८ मे २०२२
ज्ञानजिज्ञासा प्रकाशनस
पृष्ठसंख्या ६३, मूल्य १२० रु.

-परीक्षणकर्त्या – डॉ. सौ. सुमेधा प्रभाकर मराठे, मुंबई.
८-१३, सहकार नगर, वडाळा, मुंबई ४०००३१
भ्रमणध्वनी – ९८२०२३२०८२

Related posts

गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देणारे अनोखे कायदा सहाय्य चिकित्सालय सुरु

Bundeli Khabar

समाजसेवक शंकर गुप्ता का निधन, वणिका दर्पण के संपादक शुभनारायन साह को सदमा

Bundeli Khabar

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांची वाढ, मोबाईलही मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!