31.1 C
Madhya Pradesh
May 14, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय
खेल

टाटा आयपीएल – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने ७ गडी आणि ५ चेंडू राखून हा सामना जिंकला. चेन्नई सुपरकिंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऋतुराज गायकवाडने सलामीवीराची भूमिका निभावली. त्याने ४ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ४९ चेंडूंत ५३ धावा काढल्या. त्याला रशीद खानने बाद केले. मोईन अलीने २ षटकारांच्या सहाय्याने २१ धावा काढल्या. त्याला रवीश्रीनिवासन साई किशोरने बाद केले. नारायण जगदीशनने ३ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ३३ चेंडूंत नाबाद ३९ धावा काढल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांना एकही चेंडू सीमापार पाठवता आला नाही. त्यासाठी गुजरातच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मेहनत घेतली. चेन्नईचा डाव १३३/५ असा संपला. महंमद सामीने १९/२, रवीश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

गुजरात टायटन्स किती षटकांमध्ये हा सामना जिंकणार याचा अंदाज त्यांचे चाहते बांधत होते आणि खेळपट्टीवर यष्टिरक्षक वृद्धिमान सहा आणि शुभमन गील धावांची लयलूट करत होते. केवळ ६व्या षटकात ह्या दोघांनी गुजरातच्या खात्यावर ५० धावा जोडल्या. त्यात वृद्धिमान सहाच्या ३७ धावा होत्या. पण धोनीने चलाखीने गोलंदाजीत केलेल्या बदलामुळे गुजरातला फटका बसला. शुभमन गीलने ४ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ४९ चेंडूंत ५३ धावा काढल्या. त्याला मथीशा पथिरानाने पायचीत टिपले. सहाच्या सोबतीने मॅथ्यू वेडने धावगती कायम राखली असताना धोनीने पुन्हा गोलंदाजीत बदल करून किमया केली. मॅथ्यू वेडला मोईन अलीने २० धावांवर बाद केले. १३व्या षटकाच्या अखेरीस गुजरातची धावसंख्या १००/२ अशी झाली होती. त्यांना विजयासाठी ४२ चेंडूंत ३४ धावांची गरज असताना धोनीने पुन्हा गोलंदाजीत बदल करून किमया केली. हार्दिक पांड्याला केवळ ७ धावांवर मथीशा पथिरानाने तंबूचा रस्ता दाखवला. पुढच्याच चेंडूवर वृद्धिमान सहाने १ धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या २ षटकांत गुजरातला विजयासाठी ७ धावांची गरज होती. वानखेडेच्या खेळपट्टीने आज फलंदाज गोलंदाजांची परीक्षा घेतली. संथ गतीने येणाऱ्या चेंडूंमुळे फलंदाजांना मनजोगे फटके खेळता येत नव्हते. तर गोलंदाज किती वेगवान चेंडू टाकायचा या विवंचनेत होते. दोन्ही संघांना याचा फटका बसला. सरतेशेवटी २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वृद्धिमान सहाने चौकार लगावत गुजरातचा विजय साकार केला. वृद्धिमान सहाने पूर्ण २० षटकं खेळपट्टीवर ठाण मांडलं होतं. त्याने ८ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ५७ चेंडूंत नाबाद ६७ धावा काढल्या. डेव्हिड मिलरने नाबाद १५ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. गुजरात टायटन्सने १३७/३ अशी विजयी धावसंख्या नोंदवली आणि गुणतक्त्यात २० गुणांसह आपला प्रथम क्रमांक अधिक बळकट केला. त्यांचा पुढचा सामना बेंगळुरू विरुद्ध होणार आहे.
वृद्धिमान सहाला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना नाबाद ६७ धावा काढल्या.

Related posts

सामना विजयासह भारताचा मालिकेवर कब्जा

Bundeli Khabar

वेस्ट इंडिजचा भारतावर ५ गडी राखून विजय: मालिकेत १-१ बरोबरी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – कोलकात्याने जबरदस्त सामना जिंकला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!