34.4 C
Madhya Pradesh
April 28, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचे निर्विवाद वर्चस्व
खेल

टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने २४ धावांनी हा सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी ६व्या षटकाच्या अखेरीस संघाच्या खात्यावर ५० धावा जमा केल्या आणि ८व्या षटकाच्या सुरूवातीस अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दोघांचाही खेळपट्टीवर चांगलाच जम बसला होता. त्याचवेळी जेसन होल्डरने संजू सॅमसनला बाद केले. त्याने ६ चौकारांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ३२ धावा काढल्या. देवदत्त पडीक्कल यशस्वी जयस्वालच्या सोबतीला आला. १०व्या षटका अखेरीस राजस्थानची धावसंख्या ९०/२ अशी होती. कर्णधार के. एल. राहुलने मोठ्या खुबीने गोलंदाजीत बदल केला. यशस्वी जयस्वालला आयुष बदोनीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने ६ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २९ चेंडूंत ४१ धावा काढल्या. देवदत्त पडीक्कल झटपट धावा जमवण्याच्या नादात रवी बिश्नोईच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १८ चेंडूंत ३९ धावा काढल्या. दोन्ही जम बसलेले फलंदाज लागोपाठ बाद झाल्यामुळे राजस्थान संघावर सावध पवित्रा घेण्याची वेळ आली. रियान परागला रवी बिश्नोईने १९ धावांवर बाद केले. १८व्या षटकाच्या सुरूवातीलाच राजस्थानचा अर्धा संघ १४९ धावांवर परतला होता. त्याच षटकात जेम्स नीशम १४ धावांवर धावचीत झाला. रवीचंद्रन अश्विन १० तर ट्रेण्ट बोल्ट १७ धावांवर नाबाद राहिले. त्यामुळे राजस्थान रॉयल्स १७८/६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकले. रवी बिश्नोईने ३१/२, आवेश खान, आयुष बदोनी, जेसन होल्डरने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
लखनौ सुपर जायंट्सच्या डावाच्या तिसर्‍या षटकात ट्रेण्ट बोल्टने पहिल्या दोन चेंडूंवर दोन गडी बाद करून धाबे दणाणून सोडले. दीपक हुडा आणि कृणाल पांड्याने संघाचा डाव सावरला. कृणाल पांड्याला रवीचंद्रन अश्विनने २५ धावांवर बाद केले. दीपक हुडाने १५व्या षटकात स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलं. पण यझुवेंद्र चहलने १६व्या षटकाच्या अखेरीस त्याला बाद केले. त्याने ५ चौकार आणि २ षटकाराच्या सहाय्याने ३९ चेंडूंत ५९ धावा काढल्या. मार्कस स्टॉइनिसने एक बाजू लावून धरली. पण दुसर्‍या बाजूचे फलंदाज हजेरी लावून परत जात होते. ओबेद मॅकोयने १९व्या षटकात अतिरिक्त धावा देण्याचा सपाटाच लावला. त्यातच लखनौच्या फलंदाजांनी दोन चौकार मारून त्याच्या गोलंदाजीची पीसं काढली. पण हे करायला त्यांना खूपच उशिर झाला. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी ३४ धावांची गरज होती. प्रसिद्ध कृष्णाने मार्कस स्टॉइनिसला २७ धावांवर बाद केले आणि लखनौ सुपर जायंट्सचा डाव १५४/८ असा आटपला. ट्रेण्ट बोल्टने १८/२, प्रसिद्ध कृष्णाने ३२/२, ओबेद मॅकोयने ३५/२, रवीचंद्रन अश्विन आणि यझुवेंद्र चहल प्रत्येकी १ गडी बाद केले.

राजस्थान संघाने हा सामना जिंकून चांगल्या धावगतीच्या आधारे गुणतक्त्यात दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. त्यांचा पुढचा सामना चेन्नई सोबत २० तारीखला होणार आहे. ट्रेण्ट बोल्टला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना ९ चेंडूंत नाबाद १७ धावा काढल्या आणि गोलंदाजी करताना १८ धावांमध्ये २ गडी बाद केले. उद्याचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. हे दोन्ही संघ हा सामना जिंकून ४थ्या क्रमांकासाठी स्पर्धा निर्माण करतील. पंजाब पहिल्या फेरीच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. तर दिल्ली निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.

Related posts

Judo Federation of India’s National Judo Competition

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – बेंगळुरूचा रॉयल विजय

Bundeli Khabar

गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!