36.7 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » सामना विजयासह भारताचा मालिकेवर कब्जा
खेल

सामना विजयासह भारताचा मालिकेवर कब्जा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज भारत दुसर्‍या सामन्यासाठी मैदानात उतरला. नाणेफेकीचा कौल जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजकडून यष्टिरक्षक शाई होप आणि काईल मेयर्स यांनी डावाची सुरूवात केली. दोघही धावफलक हलता ठेवत होते. ९ षटकांमध्ये ७.२२च्या धावगतीने त्यांनी ६५ धावा जमा केल्या. दहाव्या षटकासाठी कर्णधार शिखर धवनने चेंडू दीपक हुडाच्या हाती सोपवला. त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर काईल मेयर्सला ३९ धावांवर झेलबाद केले. शारमाह ब्रुक्सने होपला चांगली साथ दिली. १५व्या षटकांच्या अखेरीस ६.२७ धावगतीने त्यांनी ९४/१ काढल्या. दीपक हुडा आणि यझुवेंद्र चहलने धावगतीवर लगाम घातला. त्यामुळे २०व्या षटकांच्या अखेरीस ५.६५च्या धावगतीने केवळ ११३/३ धावा धावफलकावर झळकल्या. २१व्या षटकात होप आणि ब्रुक्सची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. त्याच षटकात चहलला टोलेजंग षटकार मारत होपने अर्धशतक साजरे केले. पुढच्याच षटकात अक्षर पटेलने शारमाह ब्रुक्सला ३५ धावांवर बाद केले. त्याच्याजागी आलेल्या ब्रॅडन किंगला चहलने शून्यावर तंबूची वाट दाखवली. कर्णधार निकोलस पुरनने खेळपट्टीचा अंदाज घेत धावा काढण्यास सुरूवात केली. २५व्या षटकांच्या अखेरीस ५.६४च्या धावगतीने केवळ १४१/३ धावा धावफलकावर झळकल्या. २८व्या षटकात वेस्ट इंडिजने १५० धावा झळकवल्या. ३४व्या षटकात होप आणि पुरनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. निकोलस पुरनला शार्दुल ठाकूरने ७४ धावांवर बाद केले. ४५व्या षटकात वेस्ट इंडिजने २५० धावा झळकवल्या. त्याच षटकात चहलला टोलेजंग षटकार मारत होपने शतक साजरे केले. शार्दुल ठाकूरने १३ धावांवर रोव्हमन पॉवेलला बाद केलं. ४९व्या वेस्ट इंडिजने ३०० धावा पूर्ण केल्या. त्याच षटकात शार्दुल ठाकूरने शाई होपला बाद केलं. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ११५ धावा काढल्या. महंमद सिराजच्या शेवटच्या षटकांत अकील हुसेन आणि रोमारिओ शेफर्डने १० धावा काढत धावसंख्या ३११/६ पोहचवली. शार्दुल ठाकूरने ५४/३, अक्षर पटेल ४०/१, दीपक हुडा ४२/१, यझुवेंद्र चहलने ६९/१ गडी बाद केले. मागच्या सामन्यातून काहीही बोध न घेतलेल्या भारतीय गोलंदाजीची पिसं वेस्ट इंडिअन फलंदाजांनी काढली.

भल्या मोठ्या धावसंख्येला तोंड देण्यासाठी बदली कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गील खेळपट्टीवर उतरले खरे पण दोघांचीही देहबोली सकारात्मक जाणवत नव्हती. त्याचाच फटका मागच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या शिखर धवनला अवघ्या १३ धावांवर बाद करून रोमारिओ शेफर्डने भारतीय संघाला दिला. शुभमन गील आणि श्रेयस अय्यर जोडी जमण्याआधीच काईल मेयर्सने गीलला ४३ धावांवर बाद केले. इंग्लंड दौर्‍यावर सूर्यकुमार यादवचे कर्णधार रोहित शर्माने कौतुक केल्यानंतर त्याच्याकडून धावाच होत नाहीत. आजही केवळ ९ धावांवर काईल मेयर्सने त्याला बाद केले. १०० धावा करायला भारतीय संघाला २३ षटकं खेळावी लागली. त्यासाठी ३ गडी बाद झाले होते. २६व्या षटकात श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काईल मेयर्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत श्रेयस अय्यरने वैयक्तिक अर्धशतक आणि संघाच्या १५० धावा धावफलकावर झळकावल्या. पण अल्झारी जोसेफने ६३ धावांवर अय्यरला बाद केले. ३६ षटकांचा खेळ संपला तेव्हा १९०/४ अशी भारतीय संघाची अवस्था होती. ८४ चेंडूंमध्ये १२२ धावांची गरज होती. संजू सॅमसन आणि दीपक हुडाला किमान पुढील १० षटकं चांगली फलंदाजी करावी लागेल तरच भारतीय संघ विजयासाठी झुंज देऊ शकेल. ३७व्या षटकात वैयक्तिक अर्धशतक आणि संघाच्या २०० धावा धावफलकावर झळकावल्या. पण पुढच्याच षटकात काईल मेयर्सने त्याला धावचीत केले. अक्षर पटेलने खेळपट्टीचा ताबा घेत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. ४४व्या संघाच्या २५० धावा धावफलकावर झळकावल्या. त्याच षटका हुडा आणि पटेल यांची अर्धशतकी भागीदारी झाली. पण पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अकील हुसेनने दीपक हुडाला ३३ धावांवर बाद केले. अल्झारी जोसेफने शार्दुल ठाकूरला ३ धावांवर तंबूची वाट दाखवली. २४ चेंडूंमध्ये ३२ धावा असं समीकरण झालं. पुढच्याच रोमारिओ शेफर्डला लागोपाठ २ चौकार लगावत अक्षर पटेलने आपलं अर्धशतक झळकावलं. त्याच्या साथीला आलेल्या आवेश खानने चौकार मारत आपलं खातं उघडलं. १८ चेंडूंमध्ये १९ धावा असं समीकरण झालं. अल्झारी जोसेफने त्याच्या १०व्या षटकात केवळ ४ धावा देऊन भारतीय संघाला वेसण घातली. १२ चेंडूंमध्ये १५ धावा असं समीकरण झालं. जयडन सिअल्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत अावेश खानने भारताच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याच षटकात खान १० धावांवर बाद झाला. ६ चेंडूंमध्ये ८ धावा असं समीकरण झालं. काईल मेयर्सचा पहिला चेंडू निर्धाव, दुसर्‍या चेंडूवर १ धाव, तिसर्‍या चेंडूवर १ धाव आणि चौथ्या चेंडूवर विजयी षटकार. अक्षर पटेलने षटकार लगावत विजयश्री खेचून आणली. भारताने हा सामना २ गडी आणि २ चेंडू राखून जिंकला. ४९.४ षटकांत ३१२/८ अशी विजयी धावसंख्या झळकावली. अक्षर पटेलने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ३५ चेंडूंत नाबाद ६४ धावा काढल्या. अल्झारी जोसेफने ४६/२, काईल मेयर्सने ४८/२, जयडन सिअल्सने ४०/१, रोमारिओ शेफर्ड ६९/१ आणि अकील हुसेन ७२/१ गडी बाद केले.

सलग चार डावांमध्ये दोन्ही संघांनी ३०० पेक्षा जास्त केल्या. भारताने मालीका विजय मिळवला असला तरीही तिसरा सामना जिंकून निर्भेळ यश संपादन करण्याचा मनसुबा नक्कीच राखला असेल.

अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने गोलंदाजी करताना ४० धावांमध्ये १ गडी बाद केला होता तर फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण नाबाद ६४ धावा काढल्या होत्या. तिसरा एकदिवसीय सामना २७ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

Related posts

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

Bundeli Khabar

पंजाब किंग्सचा मोठ्या फरकाने विजय

Bundeli Khabar

घाटकोपरच्या अत्रे मैदानात रंगली ५०+ लेजंड स्पर्धा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!