21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » आगीत होरपळलेल्या रुग्णांना तीन रुग्णालयांनी उपचार नाकारले; महापौरांचे चौकशीचे आदेश
महाराष्ट्र

आगीत होरपळलेल्या रुग्णांना तीन रुग्णालयांनी उपचार नाकारले; महापौरांचे चौकशीचे आदेश

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक, गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावंही किशोरी पडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णालयांनी अशा आणिबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महापौर म्हणाल्या आहेत. या रुग्णालयांकडून उपचार का नाकारले याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण मागवले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर समाधानकारक उत्तर नसेल तर या रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महापौरांसह आदित्य ठाकरे यांची घटनास्थळाला भेट
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. “मुंबईच्या महापौरांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला अॅडमिट करून घेऊन, त्याला स्थिर करणे हे रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य असते, ते या रुग्णालयांनी का केलं नाही? याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल”, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच घटनास्थळी असलेल्या उपकरणांचा वेळीच योग्य वापर केल्यास अशा दुर्घटनांवर मात केली जाऊ शकते असेही ते म्हणाले आहे.

आगीची घटना दुर्देवी असून आग लागल्यानंतर तत्काळ घटनास्थळावर महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचले होते. जितक्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाले तितक्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या सहकार्‍यांनी सुद्धा बऱ्याच नागरिकांना इमारतीबाहेर काढण्याचे काम केले. नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, त्यांना धीर दिला, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वीजपुरवठा करणारी यंत्रणा ही सहा महिन्यातून एकदा तपासली गेली पाहिजे. त्यासोबतच आठवड्यातून शनिवार व रविवारला उंच इमारतीमधील नागरिकांचे विविध गट तयार करून त्यांना अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.


Bundelikhabar

Related posts

ट्रेन के नीचे गैप में गिर गई गर्भवती महिला, आरपीएफ जवान ने बचाई जान

Bundeli Khabar

माणसातला देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे महाराज होय – डॉ.मनीलाल शिंपी

Bundeli Khabar

रस्त्यावर गाडी थांबून कोणताही वाहतूक अंमलदार गाडीचे कागदपत्र तपासू शकत नाही – हेमंत नगराळे

Bundeli Khabar
error: Content is protected !!