40.7 C
Madhya Pradesh
May 7, 2024
Bundeli Khabar
Home » माणसा माणसा कधी होशील तु माणूस
महाराष्ट्र

माणसा माणसा कधी होशील तु माणूस

शब्दांकन: कु.तन्वी पिदुरकर
(पुनवट, ता.वणी, जि.यवतमाळ)

 माणसातली माणुसकी हरपली..! असं म्हणायला काही हरकत नाही. कारण, या चालू काळात दृश्यच तस डोळ्यासमोर झळकताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पाठीशी कुणा ना कुणाचा तरी आधार हवाहवासा वाटतो. कोणीही विना आधाराशिवाय पूर्णपणे घडत नसतं. माणूसच माणसाला आधार देऊ शकतो. पण आता खरं तर तसे दिसेनासे झाले आहेत. बघेल तो त्याचं, आमचा कोण तो..! असच चाललंय सध्या.
    गरीबाचा मित्र श्रीमंत आणि श्रीमंताचा मित्र गरीब, असं बघितलंय का तुम्ही..? श्रीमंत धनाने मोठा असतो आणि गरीब मनाने. थोडक्यात श्रीमंत धनवान आणि गरीब धनहीन. जो तो त्याच्या संसारात मग्न असतो. गरीबाला कोणाची गरजही भासत असेल तरी तो सांगणार कोणाला..? कारण, तोच त्याचा आधार असतो, ना कोणाची साथ त्याला लाभत असते. हे सर्व त्याच्या नशिबी असलेल्या गरीबीमुळे. गरीबाला कोणीही विचारत नाही. त्याचं त्यालाच बघावं लागतं. 
    श्रीमंतांसमोर हात पसरणे म्हणजे स्वतःला त्याच्या गुलामगिरीत ढकलणे, असा भेदभाव असतो. श्रीमंत श्रेष्ठ आणि गरीब कनिष्ठ असे मानले जाते. एखाद्याच्या खिशात पैसा असेल तर मित्र जोडावा नाही तर त्याला वाऱ्यावर सोडावं. कारण आपल्याला पैसा हा सर्वात श्रेष्ठ वाटतो. मनाची श्रीमंती कोणीही बघत नाही.
   एखादा व्यक्ती परिस्थितीने दरिद्री असेल तर तो त्याचा दोष आहे काय..? त्याचा जन्मच गरिबीत उतरायचा असेल तर तो काय करणार. मिळेल ते ज्याच त्याला भोगावच लागतं. जरा ऐका हो श्रीमंतांनो, तुमचा पैसा तिजोरी भरून उतू जात असेल ना तर एखाद्या गरीबाची निर्मळ मनाने मदत करा. त्याचे कष्टाचे जीवन थोडे हलके करून बघा. त्याच्या अंगावर लादलेले त्याच्या परीवाराचे ओझे कमी करून बघा. असा कितीतरी पैसा आपण मंदिराच्या दानपेटीत भरतो. पण आपल्याला काय माहिती की, तो पैसा जातो कुठे? आधीच जीवन तुमचे सुखी आहेत आणखी किती सुखी कराल..? मंदिरात जावून सुख मिळायच असतं तर त्या मंदिराच्या पायऱ्यांवर माणसं भीक मागत नसती.
    ज्यांच्या अंगावर दुःखाचा डोंगर उभा आहे, ज्यांच्याकडे पोट भरण्याइतके पैसे नाहीत त्यांना मदतीचा हात द्या. मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकून देव तर काही आपल्याला विचारपूस करत नाही की, मला इतके पैसे हवेत तितके हवेत असेही तो म्हणत नाही. मग पैसा असा मोकळा टाकून काय मिळतं..? नाही देव आपल्यावर हसत रुसत. म्हणूनच मला सांगावं असं वाटतं की, मंदिरातल्या देवाचे खोटे हसू  बघण्यापेक्षा माणसातल्या देवाचा आनंदाने बहरलेला हसरा चेहरा बघा.
  संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना संविधनाच्या मूलभूत तत्वांचा दर्जा दिला आहे. कारण समाजातील एकमेकांनबद्दलचा भेदभाव, जातीभेद, विषमता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यात समता दिसत नाही, या हेतूने त्यांनी या मुल्यांना योग्य दर्जा दिला आहे.
   जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भेदभावाचा विरोध करीत म्हंटले आहे की,

जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||१||
तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
यातून ते आपणास हेच सांगू इच्छितात की, जो समतेच्या, आपुलकीच्या, मानवतेच्या धर्माने पुढे पाऊल टाकीन त्यालाच देव मानलं पाहिजे.
आपण नेहमी म्हणत असतो की, देव चराचरात आहे त्याचप्रमाणे माणुसकी चराचरात असावी, असे निव्वळ बोलू नका तर ते आचरणात असू द्या. म्हणजे माणसातली माणुसकी हरपणार नाही. ती सर्वकाळ टिकून राहणार.

Related posts

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Bundeli Khabar

जड अंतकरणाने भक्तांनी दिला दिड दिवसांच्या बाप्पाला निरोप

Bundeli Khabar

जो पर्यंत हे प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही- डी.के. म्हात्रे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!