22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
महाराष्ट्र

डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रविंद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते.

यावेळी डोंबिवली मधील कोपर उड्डाणपूलाचे लोकार्पण, कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय प्राणवायु निर्मिती प्रकल्प व अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ह. भ. प. सावळाराम महाराजा संकुलातील प्राणवायु निर्मिती प्रकल्प, शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, आय वॉर्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, टिटवाळामधील मांडा येथील स्व. गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, तेजस्विनी बस व कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस आणि आंबिवली येथील जैवविविधता उद्यान या प्रकल्पांचे लोकार्पण झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षाचा काळ कठीण होता. जग ठप्प झाले असले तरी लोकांच्या हिताची कामे पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाला धन्यवाद देतो. चांगल्या गोष्टींचे व कामांचे कौतुक झालंच पाहिजे. कोवीड काळात केलेल्या कार्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला कोवीड इनोव्हेशन अवॉर्ड हे त्यांनी आपल्या कामाने कमावले आहे. कोवीड निर्बंधानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करत आहोत. कोवीड काळात आपण आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला आहे.

ठाण्यातील सहायक आयुक्तांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या दुर्देवी घटनेनंतर  अधिक कठोरतेने कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले की, आपण जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत. कल्याण डोंबिवलीतील नेत्यांनी एकत्र बसून या शहरासाठी काय हवे ते सांगावे. या शहरांसाठी येथील जनतेसाठी  रस्ते, पूल, रुग्णालय असे जे जे आवश्यक आहे, ते ते राज्य सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. येथील काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र शासन घेणार असेल तर राज्य शासन त्याला सहकार्य करेल. केंद्र व राज्य मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, कोविड काळात महानगरपालिकेने गतीने कामे केली आहेत. ही गती आणखी वाढवायला हवी. राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडे ठाणे जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठी प्राधान्याने निधी देता येईल. भिवंडी- कल्याण मेट्रो आणि मुरबाड रेल्वेच्या कामासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

कल्याण डोंबिवलीसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री शिंदे

पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. कोवीड विरुद्धच्या लढाईच्या कामांची दखल मा. पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांनीही महाराष्ट्राचे अनुकरण केले आहे. या काळात कल्याण डोंबिवली महानगपालिकेने चांगले काम केले आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कोपर पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. कोपर पुलाला समांतर आणखी एक अतिरिक्त पुल करण्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली।


खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, सक्षम आरोग्य यंत्रणा कशी उभी करावी हे कोविड काळात शिकण्यास मिळाले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र, ऑक्सिजन सुविधा निर्माण करत आहोत. कोविड परिस्थितीत सुद्धा विकास कामे थांबणार नाहीत याची दक्षता घेऊन पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली. या काळात राज्य शासनाने निधीची कमतरता पडू दिली नाही. कोपर पुलाचे काम जलदगतीने १ वर्ष ४ महिन्यात पूर्ण करण्यात आले. कल्याण डोंबिवली तील रस्त्यांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३६० कोटी रुपये दिले आहेत. कोपर पुलाला समांतर आणखी एक पुल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी मिळावा।

आमदार श्री. चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहरातील विकास कामांना निधी देण्याची मागणी यावेळी केली. यावेळी कोवीड अवॉर्ड मिळाल्याबद्दल आयुक्त डॉ. सुर्यवंशी तसेच शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांचा पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला।

Related posts

आ. बालाजी किणीकर व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शैक्षणिक समस्या व शालेय अनुदान विषयावर अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा

Bundeli Khabar

एक्शन ड्रामा से भरपूर कार्टेल का पोस्टर हुआ जारी

Bundeli Khabar

अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!