23.1 C
Madhya Pradesh
August 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210810 WA0013
महाराष्ट्र

बैखोफ भारतीय शैली, बेधडक बोला मनातलं

Bundelikhabar

बैखोफ भारतीयआर्चिस पाटिल /

तू मधे पडू नको !

बोट धरून चालायला शिकवत त्यांनी एक मंत्र दिला.
रात्रीच्या काळोखात घडणारी विकृती तुला दिवसा ढवळ्याही दिसेल. पाहणारे हजारो असतील पण बोलणारा – ऐकणारा कोणी नसेल. वाटेल तुला बोलू, भांडू, काहीतरी बदलू पाहू.
एकवेळ तू बोलशीलही, तू भांडशील पण त्यांच्या कडे असणारा हंटर तो बदल घडवू देणार नाही. एवढंच नाही तर तो हंटर एका शापा सारखी तुझ्या मागे लागेल. आज मी तुला हे जे बोटाला धरून चालायला शिकवतोय खरं. पण उद्या तुला चालण्यासाठी तुझी जी वाट कमवायची आहे, ती वाट हा हंटर तुझ्या कडून हिसकावून घेईल. तुझं राहणं, तुझं ताठ मानेनं चालणं सर्व ह्या हंटर च्या हुकुमावरून नाचत राहील.
मी फक्त घाबरून ‘ मग ? ‘ एवढंच बोलू शकलो.

तेव्हाच हा मंत्र त्यांनी हसत मला सांगितला.
” तू मधे पडू नको ! “
आज माझ्या समोर अश्या कित्तेक गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे हा जादूचा हंटर आहे. आणि आज नेमकं त्यांनी सांगितल्या प्रमाणे बोलावं वाटतंय, भांडाव वाटतंय. पण पाया खाली पाहिलं की समजत. आज ही वाट तुझी आहे. उद्या ती नसेल. त्या पेक्षा तू मधे पडू नको.
होणारा भ्रष्टाचार, होणारी अवैध पदार्थ विक्री. याविरोधात बोलणं माझ्या सारख्या सर्व सामन्याला किती महागात पडतं. त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो।
आज मी जिथे राहतो. तिथे राहणं हा माझा नाईलाज आहे. मुळात तो प्रत्येकाचा असतो. आपल्याला वाटतं की आपण असं जगावं, तसं जगावं. पण आपण जेवढं कमवतो, सांभाळतो, त्यातून जेवढं उरतं तेच आपली लायकी ठरवतं.
असो, पण मी जिथे राहतो ती वस्ती नुकतीच उभी राहिली आहे. आजूबाजूच्या उपनगरातले काही लोक इथे राहायला आले. ह्या सर्वांचं इथे येण्याचं कारण माझ्या कारणा इतकचं वाईट असेल बहुतेक. ह्या वस्ती मध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग दिसतो. का ? ह्याच उत्तर आहे माझ्या कडे. पालकांचा अपुरा पगार आणि मुलाचं शिक्षण हे दोन्ही बिंदू एका रेषेत साधायचे असतील ना, तर तडजोडीची रेषाच ते साधू शकते. आणि त्याच तडजोडीच्या शोधात इथल्या प्रत्येकाने ही वस्ती गाठली. पण त्या पालकांना काय माहित की त्यांची मुलं ह्या वस्तीत चालणाऱ्या सर्कशीचे विदूषक होऊन जातील.
तशी ही वस्ती खऱ्या अर्थी मुंबई, ठाणे सारख्या नगरांचे प्रवेशद्वार आहेत. महाराष्ट्र सहित इतर राज्यातून ह्या उपनगरांमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट, ह्या अशा काही मोजक्या वस्त्या ओलांडून जातात. त्यात अमलीपदार्थ ही आलेच. तर मूळ मुद्दा असा. की बाहेरून येणार्या मालचा पाहिला स्टॉप ह्या अश्या वस्त्यांमध्ये असतो आणि नगरांमध्ये घुसण्या आधी ह्या वस्त्यांमध्येच आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो त्याला शक्य होतो. मुळात ह्याला शक्य करतो तो हंटर. एकदा त्याने आपले पाय पसरले की त्यातून येणाऱ्या नफ्यासाठी सुरू होते त्या वस्तीत रहणार्यांची सर्कस.
सर्कशीच स्वरूप सोपं आहे. आपला माल विकण्यास परवानगी नाही. हे माहीत आहे. मग हा माल आम्ही विकतो हे पोलिसांना कोणी सांगू नये, ह्या साठी वस्ती मध्ये पाहिले आपला धाक निर्माण करायचा. हा धाक निर्माण करण्यासाठी गरज असते ती तरुणांची आणि काही नालायक तरुण ‘ज्याला मान त्याला सलाम, भाई’ म्हणत त्याची हजीहुजुरी करू लागतात….. छोट्या छोट्या भांडणामध्ये वस्ती समोर त्या तरुणांच्या जोरावर वर्चस्व सिद्ध करायचं आणि आपला धाक कायम करायचा. मग सुरू होते अमलीपदर्थाच्या विक्रीची सर्कस. बास्स…. गेली 5 वर्ष मी आणि बाकीचे ते तडजोडीची रेषा शोधणारे हा खेळ पाहतोय. त्यातल्या काहींची तर अशी अवस्था आहे की ज्याच्या साठी ह्या वस्तीत आलो तोच त्या सर्कशीतला विदूषक झाला. पण कोणासमोर बोलणार आणि कसं ? बहुतेक तो मंत्र त्यांना सुद्धा माहीत असावा. जरी माझा मुलगा त्यात असेल तरी मी त्यात पडणार नाही. कारण फक्त माझीच वाट नाही तर माझ्या पोराचीसुद्धा तो हंटर वाट बदलेल. मग त्या पेक्षा मी चार भिंतीच्या आत माझ्या पोराला मारेन, झोडेन, काही करेन पण ‘ मी त्यांच्या कामाच्या मधे पडणार नाही ‘. अगोदरच आपण नाईलाजाने इथे आलो. त्यात मी ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर ? नको, पहिलेच एक कुत्रा पायाचे लचके तोडत असताना, दुसऱ्या कुत्र्यांचं झंगाट कशाला मागे लावून घेऊ. असं म्हणत इथला प्रत्येकजण मुग गिळून गप्प बसलाय.
आज आसपासच्या बऱ्याच वस्तीत गांजा, चरस सारख्या पदार्थांची विक्री होताना मी पाहतोय . सर्रास तरुण त्याचं सेवन करताना मी पाहतोय. आजकालचा तरुण आईचा पदर सोडून भाईच्या लुंगी खाली चिलम पितोय. पण बोलणार कोण ? मग मी स्वतःला सांगतो.
” आर्चिस, तु मधे पडू नको.”


Bundelikhabar

Related posts

नगरसेवक संदीप पवार हत्या के आरोपी गिरफ्तार

Bundeli Khabar

पुणे मनपा ने ब्रेक द चेन के तहत मनपा सीमा के लिए संशोधित आदेश जारी

Bundeli Khabar

शातिर चोर को डोंबिवली पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar
error: Content is protected !!