27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » ह्रदयाच्या खोलीत उतरणारी मैत्रीची “ऊंचाई”
महाराष्ट्र

ह्रदयाच्या खोलीत उतरणारी मैत्रीची “ऊंचाई”

*रुपेरी पडद्यावर – गुरुदत्त वाकदेकर*

मैत्रीचं नातं सगळ्या नात्यांहून वरचढ असतं असं म्हणतात आणि चित्रपट निर्माते सूरज बडजात्या यांनी चार मित्रांच्या बिनधास्त मैत्रीतून या नात्याच्या सौंदर्याला जी उंची दिली आहे ती मनाला स्पर्शून जाते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा एक संवाद आहे, ‘मी ऐकले आहे की या एव्हरेस्टवर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते, बघायचे आहे की इथे किती उत्तरे मिळतात?’ एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाण्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगाचा निरोप घेतलेल्या या त्रिकुटाच्या आयुष्यात अनेक प्रश्न आहेत आणि या प्रवासात त्यांना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. आयुष्याकडे आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन आहे आणि यातूनच प्रेक्षक चित्रपटाच्या शेवटी एक नवीन आशा आणि नवीन विचार घेऊन घरी जातो.

कथेची सुरुवात एक मजेदार रोड ट्रिपने होते. जिथे प्रसिद्ध बेस्ट सेलर लेखक अमित श्रीवास्तव (अमिताभ) आणि त्यांचे इतर दोन लंगोटिया मित्र जावेद (बोमन इराणी) आणि ओम (अनुपम खेर) एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची उंची गाठण्यासाठी त्यांचे दिवंगत मित्र भूपेन (डॅनी) यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते निघाले आहेत. यानंतर कथा फ्लॅश बॅकमध्ये जाते. भूपेनला त्याच्या वाढदिवशी त्याच्या वयस्क मित्रांच्यासोबत एव्हरेस्टवर जाण्याची प्रचंड इच्छा होती, परंतु दुर्दैवाने त्याच्या वाढदिवसाच्या रात्री भूपेन हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतो. त्याच्या अंतिम निरोपाच्या वेळी, मित्रांना कळते की भूपेनला केवळ एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची उंची त्यांना जाणवून द्यायची नव्हती, तर त्याला त्याच्या बालपणातील प्रेमाबद्दल देखील सांगायचे होते, ज्यामुळे त्याने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. आता हे सर्व मित्र त्यांच्या वृद्धत्वाच्या आव्हानांशी तसेच आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत, परंतु मित्राच्या इच्छेसाठी अशक्य ते शक्य करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या सर्व मित्रांच्या स्वतःच्या कथाही आहेत. महिलांच्या अंतर्वस्त्रांचे दुकान चालवणारा जावेद आणि त्याची पतिव्रता पत्नी शबाना (नीना गुप्ता) यांचे सुंदर नाते आहे, त्यांना एक विवाहित मुलगी हीबा देखील आहे, तर ओमचे स्वतःचे पुस्तकांचे दुकान आहे, जे तो मॉल बिल्डर्सना कोणत्याही किंमतीला विकू इच्छित नाही. दुसरीकडे, अमित हा सोशल मीडिया आणि तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध लेखक आहे, पण त्याच्या खऱ्या आयुष्यातही अशी काही रहस्ये आहेत, जी त्याने त्याच्या प्रतिमेमुळे लपवून ठेवली आहेत. या मनोरंजक रोड ट्रिपमध्ये माला (सारिका) देखील त्यांच्यासोबत सहप्रवासी म्हणून सामील होते, परंतु या मित्रांना कल्पना नसते की मालाची तारही त्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेली असते. या खडतर प्रवासात परिणीती चोप्रा त्याची कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून सोबत आहे.

निर्माते-दिग्दर्शक सूरज बडजात्या तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा ऊंचाई घेऊन परतले आहेत. राजश्रीच्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड न करता त्यांनी समर्पक कथा मांडली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. गमतीची गोष्ट म्हणजे या प्रवासातून दिग्दर्शकही कोणत्याही वक्तृत्वशैलीशिवाय व्यक्तिरेखांचा अंतर्गत प्रवास आत्मपरीक्षणातून मांडतो. कथा वयस्क पात्रांभोवती फिरत असली तरी त्या पिढीचा विचार आणि त्यातून त्यांच्या समस्यांकडे सूरज दुर्लक्ष करत नाही. पालक-मुल, आंतर-पिढीतील मतभेदाचे तर्कशुद्ध विश्लेषण केले जाते. सूरजने या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली आहे की भावनिक क्षणांमध्ये जसे प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तसे आनंदाचे आणि हसण्याचे हलके क्षणही येतात, जिथे तुम्ही स्वतःला आवरू राहू शकत नाही. ‘शास्त्रों में लिखा है हमारे पर्वत, हमारे वेदों के प्रतीक हैं और ये तो हिमालय है’, ‘भले ही हम हिमालय के दर्शन न कर सके, पर हम ये न भूलें की हमारे अंदर भी हिमालय की वो शक्ति है जिससे हम जीवन की हर ऊंचाई पार कर सकते हैं,’  असे संवाद हृदयाच्या खोलवर जातात.

दिल्ली-आग्रा-कानपूर-लखनौ-गोरखपूर-काठमांडू हा प्रवास हृदयस्पर्शी आणि आनंददायी आहे. पूर्वार्ध दमदार आहे, पण मध्यांतरानंतर कथा थोडी रेंगाळलेली दिसते. पार्श्वसंगीत उत्कृष्ट आहे. अमित त्रिवेदीच्या संगीतात इर्शाद कामिलचे बोल भावपूर्ण आहेत. विशेष म्हणजे ‘केटी को’ हे गाणे मजेदार आहे आणि बडजात्या ज्या प्रकारे चित्रित करतात ते अविश्वसनीय आहे. हे माझे बालपण माझ्यासमोर नाचण्यासारखे आहे कारण हे सर्व अभिनेते आहेत ज्यांना मी पाहत मोठा झालो आहे. मनोज कुमार खतोई यांच्या कॅमेरा लेन्सने या रोड ट्रिपची सर्व ठिकाणे सुंदरपणे टिपली आहेत. विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचेही दर्शन घडते.

चित्रपटातील अभिनयाचा किल्ला सर्वात मजबूत आहे. प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयात अचूक आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाचे सूर जुळताना दिसतात. बिग बींच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत आणि जेव्हा ते हे मध्यवर्ती पात्र पडद्यावर साकारतात तेव्हा त्यांची शैली आणि स्वैग यांच्यासोबतच भावनांची खोली दिसून येते. अमिताभ बच्चन दाखवतात ते इतके मोठे स्टार का आहेत. अमिताभ आजारपणामुळे अंथरुणावर झोपलेले असताना तुम्ही विचार करता की काय छान काम आहे. म्हणजे ते काहीही करत नसतानाही ते खूप काही करत असतात. अमितच्या भूमिकेत त्यांनीजे काही केले आहे. त्यांच्याकडे बघून असे वाटते की हे फक्त अमिताभच करू शकले असते. त्यांचे डोळे क्लोजअपमध्ये दाखवले आहेत. जणू त्यांचे डोळे कोणालातरी शोधत आहेत. त्या डोळ्यांबद्दल जेवढे बोलले जाईल तेवढे कमीच आहे. एका मित्राच्या भूमिकेतील अनुपम खेर यांचे कौतुक केल्याशिवाय प्रेक्षक राहू शकत नाहीत. कारण ते प्रेक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या मित्राला त्यांच्ता अभिनयातून भेटवतात. नीना गुप्ता अशा कौटुंबिक भूमिकांमध्ये चपखल बसतात. खूप दिवसांनी सारिकाला मालाच्या भूमिकेत पाहून आनंद झाला. बोमन इराणी आपल्या खास अभिनयाने जावेदचे पात्र संस्मरणीय बनवतात. डॅनी एका छोट्या भूमिकेत खोल छाप सोडतो. इतक्या तगड्या स्टारकास्टमध्ये परिणीती चोप्रा तिच्या भूमिकेला न्याय देते.

राजश्री प्रॉडक्शन सुंदर आणि कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाते. मैत्रीवर आधारित राजश्री प्रॉडक्शनने १९६४ साली ‘दोस्ती’ चित्रपटाची निर्मिती केली होती. हा त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यावेळी राजश्री प्रॉडक्शनने मैत्रीची वेगळी व्याख्या मांडली आहे. हा चित्रपट जुन्या मित्रांच्या कथेवर आधारित आहे, पण सूरज बडजात्या यांनी आजच्या तरुण पिढीलाही मैत्री आणि नातेसंबंधांचे महत्त्व कळेल अशा पद्धतीने हा चित्रपट सादर केला आहे.

देश असो की गाव, भावना प्रत्येकालाच बांधून ठेवतात. प्रत्येकजण वेगळा आहे, परंतु भावना सगळ्यांनाच आहेत. सूरज बडजात्याने त्याचा चित्रपटात अनेक प्रकारे भावनांचा वापर केला आहे. अमिताभच्या आजारपणाचं दृश्य असो, एव्हरेस्ट ट्रेकला जाणारा प्रत्येकजण असो किंवा अनुपम खेर त्यांच्या हवेलीत पोहोचतो, त्यावेळी डोळे आपसूक पाणवतात. एकदा नाही तर अनेक वेळा. तसेच तुम्ही हसता अनेक वेळा अगदी मनमुरादपणे कारण हा चित्रपट भावनांनी भरलेला आहे.

इम्प्रोवाइजेशन ही या चित्रपटाची खास गोष्ट आहे. जेव्हा तुमच्याकडे अनुभवी कलाकार असतात, तेव्हा अर्धा मुद्दा दिग्दर्शकासाठी इथेच मिटतो. इथेही नेमके तेच झाले आहे. अनेक सुधारित क्रम आहेत. एका दृश्यात बोमन इराणी यांचे जॅकेट गाडीत बसताना पडते ते अमिताभ उचलतात आणि देतात. त्याचप्रमाणे एका दृश्यात अमिताभ, बोमन आणि अनुपम पेंढ्या मागे लपतात. दृश्याच्या शेवटी, बोमन आपल्या पत्नीला हात हलवताना मजेदार पद्धतीने अभिवादन करतो. अमिताभ काठीने मारतात. अनुपमचा तोल जातो आणि तो पडतो. या सगळ्या गोष्टी पटकथेत लिहिता येत नाहीत. अभिनेत्यांचे हे आश्चर्यकारक योगदान आहे.

मित्र आणि मैत्री तुमच्या जीवनात किती महत्वाची भूमिका निभावतात हे जाणून घ्यायचं असेल तर मैत्री आणि जीवनाचा अर्थ सांगणारा “ऊंचाई” हा चित्रपट नक्की पहा.

कलाकार: अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमण इराणी, डॅनी डॅन्झोप्पा, परिणीती चोप्रा, निना गुप्ता, सारिका, नफिसा अली
दिग्दर्शक: सूरज बडजात्या
लेखक: अभिषेक दीक्षित
संगीत: अमित त्रिवेदी
गीतकार: इर्शाद कामिल
निर्माता: कमलकुमार बडजात्या, राजकुमार बडजात्या, अजितकुमार बडजात्या, नताशा मालपाणी ओसवाल, राजश्री प्रोडक्शन

Related posts

आईवूमी एनर्जी ने ई-मोबिलिटी में बढ़ाया अगला कदम

Bundeli Khabar

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार

Bundeli Khabar

वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!