30.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भारताचा झिम्बांब्वेवर ५ गडी राखून विजय
खेल

भारताचा झिम्बांब्वेवर ५ गडी राखून विजय

*मालिकेत २-० आघाडी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पहिल्या एक दिवसीय सामन्यात झिम्बांब्वेला १० गड्यांनी नामोहरम करून दुसर्‍या सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरला. कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
आजही भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे झिम्बांब्वेचा अवघा संघ ३८.१ षटकांत केवळ १६१ धावा करून परतला. सीन विल्यम्सने सर्वाधिक ४२ धावा काढल्या. त्याला दीपक हुडाने बाद केले. तर रायन बर्लने नाबाद ३९ धावा काढल्या. कर्णधारासह अाघाडीच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे सलग दुसर्‍या सामन्यात झिम्बांब्वे मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. शार्दुल ठाकूरने ३ गडी तर महंमद सिराज, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि दीपक हुडाने एक गडी बाद केले.
मागच्या सामन्यातली बिनबाद विजयी जोडी फोडून कर्णधार के. एल. राहुल सलामीसाठी खेळपट्टीवर उतरला. पण ९ महिन्यांनंतर फलंदाजी करणार्‍या राहुलला केवळ एका धावेवर समाधान मानत तंबूची वाट धरावी लागली. शिखर धवन आणि शुभमन गीलने दुसर्‍या गड्यासाठी ४२ धावा जोडल्या आणि शिखर धवन ३३ धावांवर असताना बाद झाला. ईशान किशन शुभमन गीलला चांगलं सहकार्य करत होता पण खूपच सावध खेळत होता, जी त्याची खेळण्याची पद्धत नाही. त्यामुळे एका बेसावध क्षणी तो ६ धावांवर त्रिफाळाचीत झाला. गील देखील ३३ धावा काढून तंबूत परतला. दीपक हुडा आणि संजू सॅमसन विजयी घौडदौड करत असतानाच हुडा २५ धावांवर त्रिफाळाचीत झाला. सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी अधिक नुकसान न होऊ देता विजयी धावसंख्या पार केली. सॅमसनने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४३ धावा काढल्या. तर पटेलने नाबाद ६ धावा काढल्या. भारताने विजयी लक्ष्य केवळ २५.४ षटकांत गाठले. ल्यूक जोंगवेने २ गडी तर तनाका चिवांगा, व्हिक्टर न्याऊची आणि सिकंदर रझा यांनी १ गडी बाद केले. भारताने सामन्यातील विजयासह मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली.
संजू सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने नाबाद ४३ धावा काढल्या तर यष्टीमागे ३ झेल टिपले होते. तो भारतातर्फे झिम्बांब्वेच्या भूमीवर सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला यष्टिरक्षक ठरला. झिम्बांब्वे विरुद्ध तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना २२ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) दुपारी १२:४५ वाजता सुरू होणार आहे.

Related posts

पाकिस्तानचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar

विनोद कांबली, महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब ने किया सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट सीजन 9 का उद्घाटन

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!