25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » रुपेरी पडद्यावर – गुरुदत्त वाकदेकर
महाराष्ट्र

रुपेरी पडद्यावर – गुरुदत्त वाकदेकर

*‘चाळ कधीच काही विसरत नाही’*

‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ ह्या चित्रपटात ‘डॅडी’, ‘सूर्या’, ‘सोनल’ यांच्या कहाणीतलं नवीन पात्र म्हणजे ‘शकील’. ‘शकील’ ची एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. ‘सूर्या’ आणि ‘डॅडी’ या दोघांच्या वादात आता ‘शकील’ कथेला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
मराठी चित्रपटांत गुन्हेगारी विश्व नवं नाही. दिग्दर्शकांनी आपापल्या परीने हे विश्व दाखवायचा प्रयत्न केला आहे. याच विषयावर २०१५ साली ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता ७ वर्षांनी याच चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे. दहशतवाद, गँगवॉर, राजकारण, मारधाड आणि प्रमाचे नाजूक अलवार क्षण पुन्हा एकदा ‘दगडी चाळ २’ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकूणच सत्ता मिळवण्यासाठी गुन्हेगारीचा क्षेत्राचा कसा वापर केला जातो हे या चित्रपटात दाखवले गेले आहे.
‘सूर्या’ नावाच्या एका सामान्य मुलाचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास आणि त्याची हटके प्रेम कहाणी पहिल्या भागात पहायला मिळाली होती. डॅडी आणि सूर्याचे नाते आपण ‘दगडी चाळ’ मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. डोक्याचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनतो. आता दुसर्‍या भागात मात्र गुन्हेगारी विश्व सोडलेला हाच सूर्या पुन्हा या गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो हे पहायला मिळणार आहे. डॅडींसाठी काम करणारा सूर्या दुसऱ्या भागात डॅडीच्या विरोधात कसा जातो हे यात पहायला मिळणार आहे. दुसऱ्या भागात दिग्दर्शकाने मागच्या भागाशी ठेवलेला फ्लॅशबॅक उत्तम जमून आला आहे.

चित्रपटाची सुरुवात डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांच्या पक्षाच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेने होते. यामुळे सत्ताधारी पक्षातील लोकांचे धाबे दणाणतात. कारण डॅडींना मिळणारा अनेकांचा पाठिंबा. त्यातच एका कामगार नेत्याच्या हत्येमुळे पोलिसांची संशयाची सुई थेट डॅडींपर्यंत येऊन पोहचते. आपल्याला कोणीतरी अडकवत आहे हे लक्षात आल्यावर डॅडी आपला हुकूमी एक्का अर्थात सूर्याला पुन्हा बोलवण्याचा निर्णय घेतात. पण सूर्या चाळ सोडून गावाला निघून गेलेला असतो. डॅडींच्या विनंतीला तो नकार देतो. कारण सुखासमाधानाच्या संसारात सूर्या आणि कलरफुल सोनलचं आलेलं गोंडस, लाघवी बटरफ्लाय आणि त्यातच सूर्याने बायकोला वचन दिलेले असते की तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात जाणार नाही.

‘चुकीला माफी नाही’, ‘चाळ कधीच काही विसरत नाही’, ‘चाळीचे दगड एवढेही कमजोर नाहीत की उभं राहायला वार्‍याचा आधार घेतील’ यासारखे संवाद आणखी मज्जा आणतात. चित्रपटाचे संकलन उत्तम आहे, चित्रपट कुठेही रेंगाळत नाही, यात दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला साजेसे आहेत. बाकी कलाकारांचे अभिनय आणि मकरंद देशपांडेंनी साकारलेले डॅडी लक्षात राहतात. यानिमित्ताने अंकुश आणि पूजाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळत आहे. अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या) भूमिकेत असून (शकील) च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत. तसेच यतिन कार्येकर, नेहा बाम, अंबरीष देशपांडे, नचिकेत पूर्णपत्रे, श्रीकांत यादव, विजय निकम, मिलिंद फाटक, मयूर पवार, शिवराज वाळवेकर यांनी देखील आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दपूर्ण, अर्थपूर्ण आणि समयसूचक गीतांना अमितराज यांनी सुमधूर संगीताचा साज चढवला आहे. चित्रपटातील ‘राघू पिंजऱ्यात आला’ ह्या आयटम साँगची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

अशा काय घडतात की डॅडींनी सूर्याला आपल्या ज्या कामासाठी बोलवलेलं असतं त्याऐवजी सूर्या आणि डॅडींमध्ये संघर्ष सुरू होतो? तो यशस्वी होतो का? या दरम्यान नेमकं काय घडतं? ‘दगडी चाळ २’ मध्ये असे काय घडले की सूर्या डॅडींचा इतका राग राग करताना दिसतोय? ‘डॅडीं’ ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवणी करतो? ‘डॅडी’ विरुद्ध ‘शकील’ यांचे वैर चित्रपटाला वेगळाच तडका लावणार का? याची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

Related posts

पत्रकार अमृत शर्मा की एमकेएन न्यूज के भिवंडी हेड पर नियुक्त

Bundeli Khabar

कल्याणमधील वार्ड क्रमांक 35 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न

Bundeli Khabar

पावसाची जोरदार बॅटींग सुरू

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!