30.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » अटीतटीच्या सामन्यात भराताचा निसटता विजय
खेल

अटीतटीच्या सामन्यात भराताचा निसटता विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंग्लंड क्रिकेट संघाला नामोहरम करून भारतीय क्रिकेट संघ करेबियन भूमीवर दाखल झाला. वादळांचं भय करेबियनवासीयांना नाही. ते सरावलेलेच आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनला कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानेही शुभमन गीलच्या साथीने सामन्यात रंग भरायला सुरूवात केली. दोघेही उत्तम ताळमेळ साधत असताना निकोलस पुरनने गिलला धावचीत केले. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ६४ धावा काढल्या. आणि धवनसोबत पहिल्या गड्यासाठी ११९ धावा जोडल्या. त्याच्याजागी आलेल्या श्रेयस अय्यरने धवनला चांगली साथ दिली. धवन ९०पार गेल्यानंतर थोडा सावध खेळू लागला. त्याच्या ह्याच नर्व्हस नाईनटीजचा फायदा गुदाकेश मोतीने उचलला. शतकासाठी ३ धावांची गरज असताना धवन बाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ९७ धावा काढल्या. श्रेयस अय्यरने झटपट अर्धशतक पूर्ण केलं पण गुदाकेश मोतीने त्याला ५४ धावांवर बाद केलं. २३०/३ अशी परिस्थिती असताना मधल्या फळीने नांगी टाकली. त्यामुळे ५० षटकांचा खेळ संपला तेव्हा भारत ३०८/७ इतकी मजल मारू शकला. गुदाकेश मोतीने ५४/२, अल्झारी जोसेफने ६१/२, रोमारिओ शेफर्ड ४३/१ आणि अकील हुसेन ५१/१ गडी बाद केले.
वेस्ट इंडिजकडून शाई होप आणि काईल मेयर्स यांनी डावाची सुरूवात केली. महंमद सिराजने होपला झटपट तंबूचा रस्ता दाखवला. शारमाह ब्रुक्सने खेळपट्टीचा ताबा घेतला. दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने शारमाह ब्रुक्सला ४६ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात शार्दुल ठाकूरने काईल मेयर्सला देखील ७५ धावांवर बाद केले. ब्रॅडन किंग आणि निकोलस पुरनने मिळून संघासाठी ५० धावा जोडल्या. कर्णधार निकोलस पुरनला महंमद सिराजने २५ धावांवर बाद केले. यझुवेंद्र चहलने रोव्हमन पॉवेलला झटपट बाद केलं. ३७व्या षटकात वेस्ट इंडिज १९६/५ अशा अवस्थेत पोहचले. ब्रॅडन किंग आणि अकील हुसेन पुन्हा संघाच्या मदतीला धावून आले. त्यानी अर्धशतकी भागीदारी रचली. यझुवेंद्र चहलने किंगला ५४ धावांवर बाद करून विजयाच्या मार्ग मोकळा केला. पण अकील हुसेन आणि रोमारिओ शेफर्डने धावा जमवण्यास सुरूवात केली. वेस्ट इंडिजला विजयासाठी १२ चेंडूंमध्ये २७ धावांची गरज होती तर भारताला ४ गडी बाद करावे लागले असते. शेफर्डने प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सामन्यात पुढे काय होणार ह्याचे चित्र दाखवले. कृष्णाच्या ह्या षटकात १२ धावा निघाल्या. शेवटच्या ६ चेंडूंत १५ धावा असं समीकरण झालं. महंमद सिराजने शेवटचं षटक टाकायला सुरूवात केली. पहिला चेंडू निर्धाव, दुसर्‍या चेंडूवर हुसेनने १ धाव काढली, तिसर्‍या चेंडूवर शेफर्डने चौकार लगावला, चौथ्या चेंडूवर २ धावा आणि वेस्ट इंडिजच्या ३०० धावा पूर्ण झाल्या. पुढचा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. २ चेंडूंत ७ धावा. शेफर्डने पुन्हा २ धावा काढल्या. १ चेंडू ५ धावा. शेवटच्या चेंडूवर केवळ १ अवांतर धाव मिळाल्यामुळे भारताने हा सामना ३ धावांनी जिंकला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघावर शेवटपर्यंत दडपण ठेवले. हुसेनने नाबाद ३३ तर शेफर्डने नाबाद ३९ धावा काढल्या. त्यांनी ७व्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. वेस्ट इंडिजने ५० षटकांच्या अखेरीस ३०५/६ अशी मजल मारली. शार्दुल ठाकूर ५४/२, महंमद सिराजने ५८/२ तर यझुवेंद्र चहलने ५८/२ गडी बाद केले.
भारताच्या धवन, गील, अय्यर वगळता इत्त्र फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. त्यामुळे ५० धावा कमी झाल्या. तसेच गोलंदाजांनाही शेवटपर्यंत लय सापडली नाही त्यामुळे निसटता विजय ही पुढील सामन्यांसाठी धोक्याची सूचना आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने महत्त्वपूर्ण ९७ धावा काढल्या होत्या. दुसरा एकदिवसीय सामना २४ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

Related posts

टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचे निर्विवाद वर्चस्व

Bundeli Khabar

भारताने लाजिरवाणा पराभव ओढवून घेतला

Bundeli Khabar

State Level Judo Championship to be played from 30th October at Sangli

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!