25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भारताने लाजिरवाणा पराभव ओढवून घेतला
खेल

भारताने लाजिरवाणा पराभव ओढवून घेतला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० चे पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर बेफिकिरी दाखवत तिसर्‍या सामन्यात लाजिरवाणा पराभव ओढवून घेतला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला पण अखेरच्या सामन्यात दाखवलेली बेफिकिरी त्यांना लाजिरवाणा पराभव देऊन गेली. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या दबावामुळे आज पुन्हा दीपक हुडाला संघात स्थान मिळालं नाही. त्याच्याजागी आलेल्या विराट कोहलीने दोन्ही सामन्यात दिवे लावले. लयीत असलेल्या भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, यझुवेंद्र चहललाही आज संघाबाहेर ठेवण्यात आलं. त्याचा तणाव युवा गोलंदाजांना झेपला नाही. भारतीय संघात आज पर्यायी गोलंदाजच नव्हता त्यामुळे उपलब्ध पाचही गोलंदाजांचा इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने फलंदाजी स्वीकारली.

इंग्लंडची सुरूवात जेसन रॉय आणि कर्णधार जोस बटलर यांनी केली. जोस बटलर चांगले फटके मारत असतानाच आवेश खानने १८ धावांवर त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. डेव्हिड मलानने आल्याबरोबर सामन्याची सूत्रं हातात घेतली. जेसन रॉय संथ गतीने खेळत असतानाच उमरान मलिकने त्याला २७ धावांवर बाद केले. फिल सॉल्टला हर्षल पटेलने झटपट बाद केले. पण डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी ठरवून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. डेव्हिड मलानने ६ चौकार आणि ५ षटकार मारत ३९ चेंडूंत ७७ धावा केल्या. त्याला रवी बिष्णोईने बाद केले. त्याच षटकात मोईन अली देखील शून्यावर बाद झाला. हॅरी ब्रुकने केवळ ९ चेंडूंत १९ काढून आपलं योगदान दिलं. त्याला हर्षल पटेलने बाद केले. तर ख्रिस जॉर्डनने केवळ ३ चेंडूंत ११ धावा काढल्या. तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. लियाम लिव्हिंगस्टोनने ४ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत नाबाद ४२ धावा काढल्या. २०व्या षटकाच्या अखेरीस २१५/७ अशी मजल इंग्लंडने मारली.

प्रत्युत्तरादाखल भारताकडून ऋषभ पंत आणि कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवर उतरले. पण ऋषभ पंतला रिस टोपलेने झटपट बाद केले. विराट कोहलीने बेजाबदार फटका मारत तंबूचा रस्ता धरला. त्याला डेव्हिड विलेने ११ धावांवर बाद करले. रोहित शर्माही ११ धावा काढून रिस टोपलेच्या गोलंदाजीवर बाद झाला.

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्रं हातात घेतली. त्यांनी ११९ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. पण श्रेयस अय्यरला रिस टोपलेने २८ धावांवर बाद केलं. दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात चेंडू वाया घालवत होते आणि सूर्यकुमारला फलंदाजीपासून दूर ठेवत होते. त्यातच त्या दोघांचा बळी गेला. डावाच्या १९व्या षटकात भारताला विजयासाठी १२ चेंडूंत ४१ धावांची गरज होती. तेव्हा सूर्यकुमारला फलंदाजी मिळाली. त्याने मोईन अलीला दोन चौकार आणि एक षटकार लगावत धावांची बेगमी केली. पण मोईन अलीने त्याला बाद केले. त्याने १४ चौकार आणि ६ षटकार मारत ५५ चेंडूंत ११७ धावा केल्या.

सूर्यकुमार बाद झाला आणि सामना जिंकण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. २०व्या षटकाच्या अखेरीस १९८/९ अशी मजल भारताने मारली आणि सामना १७ धावांनी गमावला.
भुवनेश्वर कुमारला मालिकावीर घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या सामन्यात ३ षटकांमध्ये १० धावा देत १ गडी तर दुसर्‍या सामन्यात ३ षटकांमध्ये १५ धावा देत ३ गडी बाद केले होते. रिस टोपलेला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने २२ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते.

इंग्लंडने शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाला १२ तारीख पासून सुरू होणार्‍या एकदिवसीय मालिकेत तगडं आव्हान दिलं जाणार असल्याचे जणू संकेतच दिले आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना १२ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होणार आहे.

Related posts

सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट में संजय राउत, जितेंद्र आव्हाड, प्रवीण आमरे व शहजाद खान की उपस्थिति

Bundeli Khabar

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ६७ धावांनी विजयी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!