30.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – अटीतटीच्या सामन्यात लखनौ विजयी
खेल

टाटा आयपीएल – अटीतटीच्या सामन्यात लखनौ विजयी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा सहासष्ठवा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौने २ धावांनी हा सामना जिंकला. लखनौने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्रिकेट हा शेवटच्या चेंडू पर्यंत चालणारा खेळ आहे. कोण कधी डाव पलटवेल हे सांगता येत नाही. आजच्या सामन्याच्या ४० षटकांत ४१८ धावांचा पाऊस पडला.

यावरूनच खेळपट्टी फलंदाजांना पोषक असल्याचं दिसतं.
लखनौचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक आणि कर्णधार के. एल. राहुल यांनी नवी मुंबईत वादळ आणलं. क्षेत्ररक्षकांना फक्त सीमारेषा पार गेलेला चेंडू आणायचं काम करायचं तेही अविश्रांत. आयपीएलच्या इतिहासातील सलामीच्या जोडीची २१० धावांची सर्वात मोठी भागीदारी आज ह्या दोघांनी मिळून रचली. आणि सोबतच २०१९चा जॉनी बेअरस्ट्रो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावरचा १८५ धावांचा विक्रम इतिहासजमा केला. क्विंटन डी कॉकने १२ धावांवर असताना मिळालेल्या जिवदानाचा पुरेपूर फायदा उचलत १० चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्याने ७० चेंडूंत नाबाद १४० धावा काढल्या. तर के. एल. राहुलने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५१ चेंडूंत नाबाद ६८ धावा काढल्या. राहुल ज्या संथगतीने खेळत होता त्यावरून हे जाणवलं त्याला वैयक्तिक अर्धशतक झळकवायचे होते. अन्यथा त्याच्याजागी दुसरा फलंदाज आला असता तर संघाच्या धावसंख्येत २० ते २५ धावांचा फरक दिसला असता. २०व्या षटकाच्या अखेरीस लखनौने २१०/० धावसंख्या उभारली होती.

कोलकात्याच्या सलामीच्या जोडीने सपशेल नांगी टाकली. नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी वेळीच डाव सावरला. नितीश राणाने ९ चौकारांसह ४४ धावा काढल्या. त्याला कृष्णाप्पा गौथमने बाद केले. श्रेयस अय्यरने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत नाबाद ५० धावा काढल्या. त्याला मार्कस स्टॉइनीसने बाद केले. सॅम बिलिंग्सने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५१ चेंडूंत नाबाद ६८ धावा काढल्या. १६व्या षटकात कोलकत्याचा १४२ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. पण सामना अजून बाकी होता. त्या रंग भरायला रिंकू सिंग आणि सुनील नारायणने सुरूवात केली. शेवटच्या षटकात कोलकत्याला विजयासाठी २० धावांची गरज होती. मार्कस स्टॉइनीसच्या पहिल्याच चेंडूवर रिंकू सिंगने चौकार आणि दुसर्‍या आणि तिसर्‍या चेंडूवर सनसनीत षटकार ठोकले. चौथ्या चेंडूवर दोन धावा. आता २ चेंडू ३ धावा असं समिकरण असताना मार्कस स्टॉइनीसने रिंकू सिंगला बाद केले. संपूर्ण मैदानात शांतता पसरली. अनपेक्षितपणे गेलेला बळी सामना गमावतो. हेच आजही झालं. पुढच्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनीसने उमेश यादवचा त्रिफाळा उध्वस्त केला आणि लखनौने २ धावांनी हा संस्मरणीय सामना जिंकला. लखनौला हा विजय गुणतक्त्यात दुसर्‍या क्रमांकाचा आणि कोलकत्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचा आनंद देऊन गेला.

क्विंटन डी कॉकला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना ७० चेंडूंत नाबाद १४० धावा काढल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये हे दुसरं शतक झळकावलं. उद्याचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. बेंगळुरूला परतीच्या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे तर गुजरातला निर्विवाद वर्चस्व गाजवायचं आहे. गुजरात आधीच‌ अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवलं आहे तर बेंगळुरूला चौथ्या स्थानासाठी विजय हवा आहे. पण हा विजयही त्यांना पुरेसा नाही. इतर संघांच्या कामगिरीवरून त्यांचं भवितव्य ठरणार आहे.

Related posts

क्रिकेटच्या पंढरी रंगणार “पहिली मुंबई प्रीमियर लीग २०२१

Bundeli Khabar

डॅरिल मिशेल आणि मिचेल सँटनरमुळे न्यूझीलंडला १-० आघाडी

Bundeli Khabar

अटीतटीच्या सामन्यात भराताचा निसटता विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!