37.6 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सचा रोमहर्षक विजय
खेल

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सचा रोमहर्षक विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना ३ गडी आणि १ चेंडू राखून जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ७३ धावा काढल्या. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याचा सोपा झेल अभिनव मनोहरने यश दयालच्या गोलंदाजीवर टिपला. अंबाती रायडूने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३१ चेंडूंत ४६ धावा काढल्या. कर्णधार रवींद्र जडेजाने दोन षटकारांसह झटपट बिनबाद २२ धावा काढल्या. शिवम दुबेने १९ धावा काढल्या. त्याला डेव्हिड मिलरने धावबाद केले. जोसेफने ४-०-३४-२, महंमद शामीने ४-०-२०-१ आणि यश दयालने ४-०-४०-१ हेच गुजरातसाठी बळी मिळऊ शकले. चेन्नई २०व्या षटकाच्या अखेरीस १६९/५ इतकीच मजल गाठू शकले.
गुजरात टायटन्सकडून डेव्हिड मिलरने बिनबाद ९४ धावा काढल्या. त्यात त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. कर्णधार रशिद खानला ड्वेन ब्राव्होने मोईन अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. रशिदने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने केवळ २१ चेंडूंत ४० धावा काढल्या. गुजरात १९व्या षटकाच्या अखेरीस १५७/७ अशा अवस्थेत होता. म्हणजे विजयासाठी ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती. रवींद्र जडेजाने आजच्या दिवासातला महागडा ठरलेला गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी निवडला. ख्रिस जॉर्डन. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसर्‍या चेंडूवर डेव्हिड मिलरने षटकार मारला. चौथ्या चेंडूवर मिलरचा झेल टिपला असताना मैदानावरील पंचांनी तिसर्‍या पंचांच्या मदतीने तो उंचीचा नो बॉल ठरवला. ह्या फ्री हिटवर मिलरने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर मिलरने दोन धावा काढल्या. दुसरी धाव काढताना लॉकी फर्ग्युसनच्या दिशेच्या यष्टीचा वेध घेण्यात आला आणि तिसर्‍या पंचांनी त्याला नाबाद ठरवले. अशाप्रकारे गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना ३ गडी आणि १ चेंडू राखून जिंकला. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने ४-१-२३-३, महेश ठिकसेनाने ४-०-२४-२, मुकेश चौधरीने ३-०-१८-१ तर कर्णधार रवींद्र जडेजाने ३-०-२५-१ बळी मिळवले. १३व्या षटकापर्यंत सामना चेन्नईच्या हातात होता. एकट्या मिलरने हा सामना गुजरातच्या विजयाच्या दिशेने फिरवला. जाडेजाने शेवटच्या षटकासाठी महागड्या जॉर्डन ऐवजी मुकेश चौधरीकडे चेंडू दिला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.
डेव्हिड मिलरला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद ९४ धावा काढून महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
उद्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे.

Related posts

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून विजय

Bundeli Khabar

बेंगळुरूचा जबरदस्त विजय

Bundeli Khabar

राज्यस्तरीय ज्यूडो चॉम्पियनशीपसाठी मुंबईत चाचणी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!