39.8 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – कोलकत्याचा पलटवार हैदराबादवर ५४ धावांनी विजय
खेल

टाटा आयपीएल – कोलकत्याचा पलटवार हैदराबादवर ५४ धावांनी विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा एकसष्टवा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. कोलकाता क्नाईट रायडर्सने परतीच्या फेरीत ५४ धावांनी हा सामना जिंकला. कोलकाता क्नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कोलकाता क्नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणेने ३ षटकारांसह २८ धावा काढल्या. त्याला उमरान मलिकने बाद केले. त्याच षटकात नितीश राणालाही २६ धावांवर बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरलाही केवळ १५ धावांवर उमरान मलिकने तंबूचा रस्ता दाखवला. कोलकत्याची अवस्था ८३/४ अशी झाली असतानाच सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेलने मैदानात धुमाकूळ घातला. चेंडू त्यांना हवा त्या टप्प्यावर पडत होते आणि धावसंख्या वेगात वाढू लागली. सॅम बिलिंग्सला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्याने ३ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत नाबाद ३४ धावा काढल्या. तर आंद्रे रसेलने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत नाबाद नाबाद ४९ धावा काढल्या. २०व्या षटकाच्या अखेरीस कोलकत्याच्या खात्यावर १७७/६ अशी दमदार धावसंख्या होती. उमरान मलिकने ३३/३, भुवनेश्वर कुमार, नटराजन, मार्को जॅनसेन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

सनरायझर्स हैदराबादला आंद्रे रसेल आणि टीम साऊदीने सुरूवातीलाच दिलेल्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि एडेन मार्करामची जोडी धावांची गती वाढवू बघत होती. वरुण चक्रवर्तीने अभिषेक शर्माचा अडसर दूर केला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ४३ धावा काढल्या. एडेन मार्करामने ३ षटकारांच्या सहाय्याने ३२ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा उमेश यादवने उध्वस्त केला. १५व्या षटकात हैदराबाद ९९/५ अशा अवस्थेत होते आणि २० षटकांचा खेळ संपला तेव्हा त्यांची धावसंख्या १२३/८ अशी होती. ह्या ५ षटकांत केवळ २४ धावांत ३ गडी त्यांनी गमावले. हाच फरक सामन्याचा निकाल स्पष्ट करून गेला. आंद्रे रसेलने २२/३, टीम साऊदीने २३/२, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
आता प्रत्येक सामन्यागणिक उत्सुकता तीव्र होत जाणार आहे. अंतिम चौघे कोण ह्याचं चित्रं सातत्याने बदलण्याची शक्यता आहे.

आंद्रे रसेलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना केवळ २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा आणि गोलंदाजी करताना २२ धावांमध्ये ३ गडी बाद करण्याची किमया साधली. त्याच्या ह्या अष्टपैलू कामगिरीचा गौरव करण्यात आला. उद्याचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आणि दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. लखनौ पहिल्या फेरीच्या पराभवाची परतफेड करण्या उत्सुक आहे. तर राजस्थान निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. गुजरातला आपलं स्थान बळकट करण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.

Related posts

हरमनप्रीत दीडशे टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू

Bundeli Khabar

भारताचा वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा योजनाबद्ध विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!