25.9 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20220117 WA0008
महाराष्ट्र

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवारी भावसार सभागृह, परमार गुरूजी मार्ग, परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. हौशी गायक आणि तेही ज्येष्ठ असा जबरदस्त मिलाफ ह्या निमित्ताने उपस्थित श्रोतृवर्गाने अनुभवला. ८४ पार केलेले घाडी मास्तर हार्मोनियमवर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अविरत सगळ्या गायकांना साथ देत होते तर ८० पार केलेले स्पर्धक नाचत आपलं गीत सादर करत होते. जगभरातली अशी पहिलीच स्पर्धा असावी ज्या स्पर्धेत पहिल्या फेरीत उत्तीर्ण न झालेलेही अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत शेवटपर्यंत सभागृहात थांबले होते. हेच आयोजकांचं आणि त्यांना साथ देणार्‍या सर्वांचं यश आहे.
सकाळच्या सत्रात मुंबई फेसकॉमचे अध्यक्ष शरद डिचोलकर, आग्रीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी सुशांत पेडणेकर, साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, परीक्षक त्रयी महापौर पुरस्कार प्राप्त चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम आणि स्वामीचे अध्यक्ष मोहन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याचवेळी स्वामीच्या ज्येष्ठ गायकांनी “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना सादर करून सभागृह भारावून टाकले.
एकामागे एक हौशी ज्येष्ठ स्पर्धक येत होते आणि परीक्षकांसाठी आव्हान निर्माण करत होते. व्यासपीठावरून खाली येताच स्वामीचे कार्यकर्ते स्पर्धकांना सन्मानपूर्वक सहभाग प्रमाणपत्र देत होते. सर्व स्पर्धकांसाठी तो एक पुरस्कार सोहळाच होता. स्पर्धा केवळ नावाला उरली होती. तो जणू स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता. शाळासोबती कित्येक वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर जो आनंद असतो तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. ह्या सार्‍यावर कळस म्हणजे स्वामीचे वादक कलाकार जे संपूर्ण कार्यक्रमासाठी वाद्यवृंद सांभाळत होते. त्यात दत्ताराम घाडी, नंदकिशोर आरोंदेकर, दिलीप मेस्त्री, मंगेश तळगावकर, विजय घाडी, संतोष घाडी, नितीन तांबे आणि शिवाजी गावकर हे परीक्षकांसोबत स्पर्धकांचीही दाद मिळवत होते. अंतिम फेरीच्या मध्यंतरात स्वामीचे हौशी ज्येष्ठ गायक राजरत्न कदम यांनी अनुप जलोटांचं “एैसी लागी लगन” हे भजन सादर केलं आणि सारा माहोल भक्तीरसात न्हाऊन गेला.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नाना पालकर स्मृती समितीचे विश्वस्त किरण करलकर, बांद्रा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सुधाकर भाटोवडेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश भगत, डॉ. रश्मीन जैन, रमेश धात्रक, हिरेश चौधरी असे विविध क्षेत्रातले मान्यवर त्यांच्या वेळेप्रमाणे सभागृहात हजर होत होते आणि स्पर्धकांसोबतच आयोजकांचेही मनोबल वाढवत होते.
परीक्षक चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम यांनी चोख परीक्षण करताना प्रथम क्रमांक मधुकर कमलाकर वत्स, द्वितीय क्रमांक भरत कस्तुर, तृतीय क्रमांक विभागून जगदीश मुदलियार आणि दिलीप मेस्त्री तर उत्तेजनार्थ दिपक आजरेकर आणि गणेश करलकर यांना गायकी, उच्चार, सादरीकरण यांच्या एकत्रित गुणांकणाच्या आधारे जाहीर केला. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सकाळचा चहा कॉफी नाष्टा, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी पुन्हा चहा कॉफी बिस्किट असा बेत स्वामीच्या आयोजकांनी सर्वांसाठी ठेवला होता. स्पर्धकांबद्दल प्रकर्षाने एक नमूद करावसं वाटतं ज्येष्ठ असले तरी सगळे शिस्तबद्घ पद्घतीने संपूर्ण दिवसभर कार्यक्रमात वावरत होते. रांगेत चहाकॉफी सोबत नाष्ट्याचा आस्वाद घेत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळीही स्वयंशिस्तीने जेवणाच्या जागी अधीक गर्दी न करता जागा होईल त्याप्रमाणे उभे राहून किंवा बसून जेवणाचा आस्वादही घेत होते. आजच्या तरूणाईने यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. संपूर्ण दिवसभर ह्या स्पर्धेचं सूत्रसंचालन न थकता, सर्वांना सांभाळून घेत, स्पर्धा सातत्याने प्रवाहित ठेवण्याचं काम अनिल तावडे यांनी चोख बजावलं. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहन कटारे, प्रदीप ढगे, राजरत्न कदम, वैशाली शिंदे, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, रचना खुळे, साध्वी डोके, ममता खेडेकर, जयश्री भोसले, सुमंगल गुरव, विजया सुर्वे, गोविंद राणे आणि उल्हास हरमळकर यांनी अविरत मेहनत घेतली.


Bundelikhabar

Related posts

नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी

Bundeli Khabar

हप्ता मांगने के आरोप में बोगस महिला पत्रकार को किया गिरफ्तार

Bundeli Khabar

ठाणे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” खान्देश सुपुत्र” कल्याणजी घेटे यांना ” राष्ट्रपती गुणवत्ता पोलीस पदकाने ” सन्मानित.

Bundeli Khabar
error: Content is protected !!