22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक
महाराष्ट्र

ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक

शब्दांकन: वैष्णवी बांगरे
मार्गदर्शक: डॉ.दिपेश पष्टे

        शाळेतले दिवस आठवले की मनाला किती प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. शाळेतले ते दिवस किती गमतीजमतीचे होते. मित्रमैत्रिणींशी रोज दंगामस्ती, भांडण, एकमेकांवर रुसणं आणि लगेच सारं काही विसरून परत मैदानावर हसत खेळत बागडायचं आणि वर्गातही अगदी मजेत शिकायचं. किती सुखद आहेत हे क्षण. पण आज या दिवसांची फक्त आपण कल्पना करू शकतो. आज आपली शाळा मोबाईलवर भरते. शाळेची घंटा मोबाईलच्या नोटिफिकेशनच्या रूपातून वाजते. किती प्रगती केली हो आज विज्ञानाने. आज सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आजच्या विद्यार्थ्याला शाळेतल्या गमतीजमती सुद्धा ऑनलाईन अनुभवाव्या लागणार आहेत. खरंच अनुभवता येईल का??
           आजचा प्रत्येक विद्यार्थी माझे ऑनलाईन क्लासेस आहेत म्हणतो. खरंच आज विद्यार्थी शिकत आहे का? प्रत्यक्ष शाळा भरायची तेव्हा शिकण्याचा जो रस विद्यार्थ्यांमध्ये होता तो आता आहे का? ऑनलाईन क्लासेस आज होत आहेत तिथे आपले गुरु आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देऊ शकत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण, त्यांच्यात दडलेले कौशल्य तर आज दडूनच आहेत ना. ते कुठे आपल्याला दिसत आहेत ?
         मार्च २०२० पासून शाळा- कॉलेज बंद आहेत. त्या आधी विद्यार्थी शाळेत जात होता. शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना समोरासमोर, प्रत्यक्ष मिळत होते. शिक्षकांच्या लक्षात यायचं कोणत्या विद्यार्थ्यामध्ये  कोणते कलागुण आहेत? कोण कुठं कमी आहे? कोणाला काय करता येतं, काय जमतं, काय करता येत नाही, सारं काही समजायचं. सर्वांच्या अंगी हे वेगवेगळे कलागुण असतात, ते ओळखून शिक्षक विद्यार्थ्यांना समोर नेण्याचा प्रयत्न करायचे. पण आज खरंच ऑनलाईन क्लासेसमध्ये शिक्षकांच्या लक्षात येतं का, की कोणता विद्यार्थी काय करू शकतो ? कोणामध्ये काय सुप्तगुण आहेत ? कोणत्या विद्यार्थ्याचे काय वैशिष्ट्य आहे? कोण कुठे मागे आहे? ऑनलाईन क्लासेस तर आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देऊ शकणार. पण विद्यार्थ्यांचे कौशल्य कसे विकसित होणार? इतर क्षेत्रात विद्यार्थी पुढे कसा जाणार?
आज शाळा प्रत्यक्ष भरत नसली तरी विज्ञानाच्या किमयेने ऑनलाईन शाळा सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा भरायची तेव्हा जे आयुष्याचे धडे मिळत होते, ती शाळा जे जगण्याचं मर्म शिकवत होती ते खरंच ऑनलाईन शाळा शिकवत आहे का?शाळेत गेलं की रोज काही तरी नवं शिकायला मिळत होतं. समाजात कसं वावरायचं? कोणासोबत कसं वागायचं? मोठ्यांचं आदर करायचं. सर्वांशी समान नात्याने वागायचं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळत होत्या. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर जीवनाची व्याख्याच ती शाळा आपल्याला शिकवत होती. ते सगळं आपल्याला एका छोट्याशा स्क्रीनवर शिकायला मिळणार का?
लहान मुलं ही ओल्या मातीप्रमाणे असतात. त्यांना योग्य वेळी योग्य आकार देणं गरजेचं असतं. कुंभार माठाला जसं आकार देतो तसा तो घडत जातो. अगदी तसंच मुलांना तुम्ही जसा आकार देणार तसंच ते घडणार. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ओळखणार तेव्हाच ते त्यांना आकार देऊ शकतील ना. या छोट्या छोट्या मुलांमध्ये उत्तम वक्ता, गायक, लेखक, कवी दडलेला असतो. हे दडलेले कौशल्य कळणार कसे?
कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्या.परीक्षा रद्द झाल्या. बाहेर राहून किंवा वसतिगृहात राहून शिकणारे सर्व विद्यार्थी घरी परतले आणि आता जवळपास दीड वर्षांपासुन घरीच आहेत. त्यामुळे आज अनेक मुलांचा आत्मविश्वासच हरवलाय. प्रत्यक्षात शाळा सुरू असताना अनेक उपक्रमांत सहभागी होणारा विद्यार्थी, विविध कार्यक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःच्या कौशल्यांचा विकास करणारा विद्यार्थी आज शाळाच सुरू नसल्याने स्वत:लाच विसरत चाललाय. त्याच्या अंगी असलेला आत्मविश्वास कुठेतरी हरवत चाललाय. स्वत:च्या मनातलं शब्दांत व्यक्त करायला तो घाबरतोय. शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत होता. त्यांना जगण्याची एक नवी दिशाच मिळत होती. ती दिशा, ते शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन खरंच आपल्याला ऑनलाईन शाळेतुन मिळणार का?
पहिल्या वर्गात आपण प्रवेश घेतो म्हणजे त्या दिवशी आपला एक नवा जन्मच झालेला असतो आणि तेव्हा शाळा ही आपली माता असते. या मातेकडून आपल्याला संस्कारांचे धडे मिळत असतात. ताठ मानेने जगण्यासाठी, समाजात सन्मानाने वावरण्यासाठी ही माता आपल्याला वाट दाखवत असते. ज्या समाजात, देशात आपण राहतो त्या समाजासाठी, देशासाठी जमेल ते करायचं धाडस ही माता देते. आपण जन्माला येतो ते एक ध्येय घेऊनच. प्रत्येकाच्या जन्माचा एक वेगळा उद्दिष्ट असतो. ते ध्येय, ती आयुष्याची उद्दिष्टं आपली ही दुसरी माता आपल्याला दाखवते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची वाट ही माता दाखवत असते. ऑनलाईन शिक्षणाने खरंच हे सगळं शक्य आहे का?
सरकार म्हणतेय, ‘आज आपल्यासमोर ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. मुलं प्रत्यक्ष शाळेत जात नसले तरी ऑनलाईन शिक्षण तर सुरूच आहे.’ पण खरंच ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होत आहे का? मी माझ्या गावातीलच उदाहरण देते. एक दिवस मी एका मुलाला विचारले “कोणत्या वर्गात आहे तू आता आणि शाळा तर बंदच आहे मग ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत का?” तो म्हणाला,”मी आता आठवीत आहे. माझे ऑनलाईन क्लासेस तर खूप दिवसांपासून सुरू आहेत. मी माझा गृहपाठ दररोज पूर्ण करून पाठवतो. दररोज अभ्यास पण करतो. परीक्षा झाली तर जास्ती गुण मिळाले पाहिजे ना. त्याची वक्तृत्व शैली उत्तम होती म्हणून मी सहजच विचारली, “एक वक्तृत्व स्पर्धा आहे. सहभागी होते का?” तो म्हणत होता, “मी पहिले न घाबरता कोणत्याही स्टेजवर बोलत होतो, जिथे संधी मिळेल तिथे सहभागी होत होतो. पण आता मला थोडी भीती वाटते.” मला हेच सांगायचं आहे की ऑनलाईन शिक्षणाने आपल्याला ज्ञान मिळत आहे पण तो फक्त शाळेतल्या परीक्षेपुरता मर्यादित आहे. आपल्या आयुष्याच्या परीक्षेचं काय?आयुष्याच्या परीक्षेत फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. माणूस सर्वार्थाने परिपूर्ण असायला हवा. जीवन एक स्पर्धाच आहे. या स्पर्धेत टिकायचं असेल तर स्वत:ला परिपूर्ण बनवायचा प्रयत्न करा. सर्वांना सर्व काही करता येणार असं तर नाही. पण जी कला आपल्या अंगी आहे तिला तर विकसित करा. सर्वार्थाने परिपूर्ण कोणीच नाही होऊ शकत. काही ना काही कमी आपल्यामध्ये असतेच. पण मला वाटतं स्वत: ला कोणापेक्षा कमी लेखण्यापेक्षा किंवा आपली तुलना इतरांशी करण्यापेक्षा आपल्याला जे जमतं ते करा.

Related posts

डॉ.निलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना महिला सुरक्षेबाबत साकडे

Bundeli Khabar

गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप

Bundeli Khabar

सोमवारपासून बेस्ट उपक्रमाची ठाणे वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान प्रीमियम बससेवा सुरू होणा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!