39.3 C
Madhya Pradesh
April 25, 2024
Bundeli Khabar
Home » कवितेचे घर – सर्जनशील निर्मितीचा अभिनव प्रयोग
महाराष्ट्र

कवितेचे घर – सर्जनशील निर्मितीचा अभिनव प्रयोग

*चंद्रपूर जिल्हयातील शेगांव (बु) येथील कवितेच्या घराच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने*

कोट्यावधी जगतात जिवाणू जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती !

काही लोक या पृथ्वीतलावर जन्म घेतात आणि चाकोरीबद्ध जीवन जगून निघून जातात. परंतु काही लोक मात्र कुसुमाग्रजांच्या कवितेतील या नाविकांप्रमाणे कुठलातरी आगळावेगळा प्रयोग करण्यात मग्न असतात. असे लोक काहीतरी अद्वितीय कार्य करीत असतात. अलौकिक अशी नवनिर्मिती त्यांच्या हातून घडत असते. नवे प्रयोग, नव्या कल्पना, नव्या संकल्पना, नवा विचारव्यूह मनात रुजवून त्यांना कृतीत उतरविण्याचा सतत ध्यास त्यांनी घेतलेला असतो. खरं म्हणजे असे लोक नव्या नभाचे नवे क्षितिजच निर्माण करीत असतात. त्यांच्या ध्येयवेडया कल्पना त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, नव्या संकल्पनेचे वेड घेऊन ते वावरत असतात, या मनातल्या संकल्पनांचा अंमल करण्यासाठी मग ते आपले तन मन धन अर्पण करीत असतात. बरेच लोक आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घालत असतात. अशा ध्येयवेडया लोकांच्या मनात कधी कोणती भन्नाट कल्पना येईल सांगता येत नाही.

अशीच एक भन्नाट कल्पना आणि अभिनव अशा सर्जनशील निर्मितीचा प्रयोग म्हणजे ‘कवितेचे घर’ या वास्तुनिर्मितीच्या कल्पनेकडे पाहता येईल. “कवितेचे घर’ ही कल्पना वाचूनच आपण कदाचित थक्क झाला असाल किंवा आपल्यासारख्या वाचकांना या घराविषयीची उत्सुकताही वाटत असेल, पण होय, हे घर नक्कीच साकारले गेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेगाव (बुद्रुक) नावाचे एक गाव आहे. या गावात विकास ग्रुपच्या सौजन्याने आणि मूळचे शेगांव येथील आणि सध्या कल्याण येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर पेटकर यांच्या भन्नाट कल्पनेतून ही ‘कवितेचे घर’ नावाची काव्यवास्तू साकार रूप धारण करून आज मोठया थाटात उभी आहे.
शेगांवचे बापूरावजी पेटकर आणि कौसल्याबाई पेटकर हे कुटुंब मोठे प्रतिभाशाली कुटुंब. बापुरावजींना शिक्षणात रुची आणि आई कौसल्याबाईंच्या तोंडी लोकगीतांची मुखोद्गत मांदियाळी. या दाम्पत्याच्या तीन मुलींची आणि पाच मुलांची शिक्षणात तर रुची निर्माण झालीच. पण आई कौसल्याबाईकडून मिळालेला साहित्य कलेचा वारसा सर्वांनीच जोपासला. जिजा परिचारिका, माधुरी प्रख्यात डॉक्टर आणि छाया आदर्श शिक्षिका तर मुले ब्रम्हानंद, मधुकर, सुधाकर, श्रीकांत आणि किशोर अनुक्रमे बॅक मॅनेजर, इंजिनिअर, डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील झाले. पण आपला व्यावसायिक हुद्दा सांभाळतानाच ते साहित्याचे वाचन करीतच राहीले. या सर्वांचे वाचनाचे वेड सर्वांच्या चर्चेचा विषय राहिले आहे. नोकरीच्या आणि व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे त्यांचे शेगांवला जाणेयेणे कमी झाले, तरी गावाची ओढ मात्र त्यांनी कायम ठेवली. गावाचा संबंध असलेल्या सर्वांशी संपर्क साधून शेगावच्या विकासासाठी श्रीकांत आणि किशोरने “विकास ग्रुप” स्थापन केला. लोकवर्गणीतून लोकोपयोगी कामे सुरू केलीत आणि गावात विकासाची कामे करून गावाशी आणि गावच्या मातीशी असलेला ऋणानुबंध त्यांनी कायम जपला. गावातील आणि गावाबाहेर गेलेले नागरिक मासिक पैसा विकास कामासाठी जमा करीत असतात.

शेगांवचे मातीचे घर पडायच्या अगोदरच त्या ठिकाणी नवीन काहीतरी बांधायचं अशी किशोर आणि श्रीकांतची योजना होती. त्याला कारण ‘कविता दिवस’ ठरला आणि किशोरच्या डोक्यात आले की घराचे नाव ‘कवितेचे घर’ असेच ठेवायचे. ह्याच घरात आईने दळण दळीत असताना बहिणाबाईच्या कविता म्हंटल्या होत्या. बाबासाहेबांवर असलेली कितीतरी गाणी म्हंटली होती. कोणत्याही लहान मुलाचे नाव ठेवायचे असले की आई गाणे म्हणण्यात पुढाकार घ्यायची. वडील बंगईवर झोके घेत गाणे म्हणायचे. घरात ही भावंडं ह्याच ठिकाणी गाणे म्हणत असायचे. त्यामुळे काव्याचा नेहमीच संबंध. त्यात श्रीकांत कवी म्हणून प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर. मग नवीन होणार्‍या घराला ‘कवितेचे घर’ हे समर्पक नाव वाटले. किशोर व्यंगचित्र काढतो तसेच काही लघु कथा लिहितो, ज्या वास्तव जीवनावर आधारीत कथा असतात. त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांच्याकडून रेल्वे विषयक व्यंगचित्र तयार करून घेतले, आई कौसल्याबाईंनी त्यांचे प्रकाशन केले. व्यंगचित्रांचे पुस्तक ‘रेल चली’ या नावाने प्रकाशित झाले. रसिकांची आणि समीक्षकांची या पुस्तकाला भरभरून दाद मिळाली.

किशोरने मनात घोळत असलेल्या कवितेच्या घराची कल्पना बंधू श्रीकांत यांच्यापुढे मांडली. श्रीकांत हा तर कवितेच्या बेहोशीत जगणारा प्रतिभावंत माणूस. त्याची कवितेची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत, एक साहित्यिक म्हणून महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात तो चांगलाच रुळला आहे. तो एक चांगला चित्रकारही आहे. अनेक ठिकाणी त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही लागले आहे. त्याने लगेच किशोरच्या मनातील संकल्पना उचलून धरली. किशोरची कल्पना, श्रीकांतची साथ आणि पेटकर बहीणभावंडांचा होकार “कवितेचे घर” साकार होण्यास कारणीभूत ठरला आणि सर्वांच्या आर्थिक सहकार्यातून आणि विकास ग्रुप शेगांवच्या सौजन्याने कवितेचे घर ही सहाशे फुटाची अभिनव वास्तू उभी झाली.

हे घर म्हणजे कवितेशी संबंधित कार्यक्रमांना आणि उपक्रमांना वाहिलेली वास्तु आहे. या कवितेच्या घरात मराठीतील प्रसिद्ध अशा कवींच्या कविता त्यांच्या छायाचित्रासह लावण्यात आल्या आहेत. कवितेचे घर पाहायला येणाऱ्या काव्यप्रेमींना प्रसिद्ध कवींच्या कवितांची ओळख होणार आहे. पाहता पाहता सर्वत्र कवितेच्या घराची चर्चा सुरू झाली आणि कवितेच्या घराचा विषय घेऊन अनेकांनी कविता रचल्या. या कवितांचे दर्शन आपल्याला या घरात होईलच.

या कवितेच्या घराच्या पुढील उपक्रमांविषयी विचारले असता श्रीकांत व किशोर पेटकर म्हणाले, घराच्या पुढे मोठा परिसर आहे. मराठी कवितेत आलेल्या विविध फुलांची झाडे लावून त्यांच्याजवळ त्या फुलांविषयीच्या मराठीतील कविता लिहिल्या जातील. या माध्यमातून काव्यप्रेमींना फुलांचीही ओळख होईल आणि फुलांची कविताही वाचायला मिळेल. भविष्यात कवितांचे मोठे दालन तयार करण्यात येणार असून मराठीतील नामवंत कवींच्या कवितासंग्रहाबरोबरच नव्याने प्रकाशित होणाऱ्या कवींच्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे, यासाठी महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही कवितासंग्रह प्रकाशित झाला तर कविता संग्रहाची एक प्रत ‘कवितेचे घर’ मु. शेगाव (बुद्रुक) ता. वरोरा, जि. चंद्रपूर या पत्त्यावर पाठविण्याची विनंतीही कवींना त्यांच्याकडून करण्यात येत आहे. शेगांव (बु) हे गाव ताडोबा अभयारण्यापासून अगदी जवळ आहे. पुढील काळात ताडोबा तसेच आनंदवन बघायला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी कवितेच्या घराला भेट द्यावी असे एक साहित्य पर्यटन स्थळ करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. हे त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या सोबत आहेतच. हे कवितेचे घर अनेकानेक काव्य फुलांनी फुलून निघावे. या काव्य फुलांचा बहर उत्तरोत्तर वाढत जावा ही आपण अपेक्षा बाळगू या.

११ डिसेंबरला या कवितेच्या घराचे उद्‌घाटन होणार आहे. या समारोहाच्या निमित्ताने मी हे घर बघायला जात आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी शेगांव (बु) ला येऊन कवितेचे घर बघायला जरूर या. येताना मला नक्की फोन करा. तुमच्या येण्याच्या प्रतिक्षेत हे घर अवश्य राहील.

प्रा. प्रमोद नारायणे
यशवंत महाविद्यालय, वर्धा
मो.९८५o३०९६६५

Related posts

संत गाडगे महाराज धर्मशाळेस देवीसिंग शेखावत यांची भेट

Bundeli Khabar

काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Bundeli Khabar

केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!