20 C
Madhya Pradesh
September 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20221207 WA0012
महाराष्ट्र

ज्येष्ठ नाट्यकर्मी ‘कलावंत कार्यकर्ता’ मोहनदास सुखटणकर यांचे निधन

Bundelikhabar

8 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे अज (६ डिसेंबर २०२२) निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सुखटणकरांच्या निधनाने रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे. मराठी नाटकांमध्ये मोहनदास सुखटणकर यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले असून मोहनदास यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

५० वर्षांहून अधिक काळ सुखटणकर यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. पडेल ते काम केलं आणि संस्था उभी केली. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ या भूमिकेत वावरले. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची दोन दैवत, कुसूमाग्रज आणि पु.ल. देशपांडे या दोघांचंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. सुखटणकरांना भेटायला दोन दैवतं एकाचवेळी त्यांच्या घरी गेले होते. असा योग किती कलाकारांच्या आयुष्यात आला असेल हा प्रश्न आहे. मोहनदास यांचे सर्वांशी अतिशय जवळचे आणि मैत्रीचे संबंध होते. श्रीराम लागू, वसंतराव कानिटकर ते अलिकडचा समीर चौघुले साऱ्यांशीच त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यात नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झाले. नोकरीसाठी मुंबई आल्यानंतर त्यांनी टंकलेखक आणि लिपिक म्हणून काम केले. पुढील शिक्षणसाठी त्यांनी जयहिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्यांच्यातील अभिनेत्याला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये असताना त्यांना सुनील दत्त, आत्माराम भेंडे, आशालता भेंडे, बबन प्रभू, रमेश चौधरी अशा कलाकार मंडळींची साथ लाभली.

‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत दुसरीत शिकत असताना त्यांनी एका छोटया नाटकात काम केले होते. ‘खोडकर बंडू’असे त्या नाटकाचे नाव होते. या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘अरे तू नाहीतरी नुसता हुंदडत असतोस, मस्ती करतोस तर नाटकात काम कर’ असे शाळेतील आरोदेकर मास्तरांनी त्यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी ‘छे, छे हे नाटक-बिटक मला नाही जमायचे’ असे उत्तर मास्तरांना दिले होते. मात्र मास्तरांनी त्याचे तोंड रंगविले आणि अखेर त्यांनी त्या नाटकात काम करायला होकार दिला. तेव्हापासून मोहनदास सुखटणकर यांच्या तोंडाला कायमचा रंग लागला. यानंतर त्यांनी रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळून आयुष्यभर ‘कलावंत कार्यकर्ता’ म्हणून काम केले.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी स्त्रीपात्र सोडून बहुतांश भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी ४० ते ४५ नाटकात काम केले होते. ‘संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटीक’, ‘होनाजी बाळा’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. नाटकातील एखादा कलाकार गैरहजर असेल, तर नाटकाचा प्रयोग रद्द होऊ न देता त्या ठिकाणी समर्थपणे उभं राहून ती भूमिका सादर करण्याचं कौशल्य मोहनदास सुखटणकर यांच्याकडे होतं. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही ते झळकले.

त्याबरोबरच ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले. पण टीव्हीवरील मालिका विश्वात ते फारसे रमले नाहीत. रंगभूमीवर कामाचा जिवंत अनुभव घेतल्यामुळे त्यांनी पुढे नाटकातच काम केले.

*मुख्यमंत्र्यांची मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली*

नाट्याचार्य मोहनदास सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनी अखंड आयुष्य मराठी कला क्षेत्राला अर्पण केले. रंगभूमीच्या सेवेचे व्रतच त्यांनी घेतले होते. मराठी साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक चळवळी, घडामोडींशी त्यांचा निकटचा संबंध होता.

ते स्वतःला या क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणवत. त्यांनी या क्षेत्रातील कित्येक उदयोन्मुख तरुणांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. या होतकरूंसाठी नाट्याचार्य सुखटणकर आधारवड होते. त्यांच्या निधनामुळे कला-साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात पिढ्यांना जोडणारा महत्वाचा दुवा निखळला आहे. नाट्याचार्य मोहनदास सुखटणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

*निधनाने निष्ठेने रंगभूमीची सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी गमावला – सुधीर मुनगंटीवार*

मोहनदास सुखटणकर यांच्या निधनाने निष्ठेने रंगभूमीची सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी गमावला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

दी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ केलेली नाट्यसेवा महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असेही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. नाटकासह चित्रपटांमध्ये अभिनय करत त्यांनी सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या नाट्यप्रवासात दी गोवा हिंदू असोसिएशनला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत कलावंत म्हणून त्यांनी प्रवेश केला व नंतर कार्यकर्त्याच्या भूमिकेत ते वावरले. पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी नाट्यक्षेत्राची अव्याहतपणे सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


Bundelikhabar

Related posts

कुर्ला में गांधी मैदान से अतिक्रमण मुक्त कराने को सरकार राजी

Bundeli Khabar

त्या ओला उबेर चालकाच्या खुनाचा तपास पूर्ण.

Bundeli Khabar

मुली वाचवा मुली शिकवा हा दृष्टिकोन सर्वांनी समोर ठेवून स्रीभ्रूण हत्या टाळावी- प्रताप राव पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!