23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » पु. ल. कला महोत्सव २०२२चे आयोजन
महाराष्ट्र

पु. ल. कला महोत्सव २०२२चे आयोजन

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक १२ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२२’चे रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे १२ वे वर्ष असून यावर्षी या महोत्सवाची थीम “हे जीवन सुंदर आहे” ही असणार आहे. आनंदयात्री श्री. पु. ल. देशपांडे यांना ही भावार्थ पुष्पांजली असणार आहे.

या आनंद महोत्सवात विविध सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रम, प्रदर्शन व वस्तू विक्री स्टॉल्स तसेच विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे. दिव्यांग, महिला, बचत गट, तृतीयपंथीय आणि अपंगांकरिता या महोत्सवात प्रदर्शन व विक्री स्टॉल्स असणार आहेत. संदर्भ महोत्सव मोफत असणार आहे.

शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सायं ६:३० वा या महोत्सवाची सुरूवात सुनीला पोतदार यांच्या गणेश व सरस्वती वंदनेने होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शन व वस्तू विक्री स्टॉल्सचे उद्घाटन होईल आणि रात्री ७ वा. अकादमीची निर्मिती असणाऱ्या आणि अण्णा भाऊ साठे लिखित, शिवदास घोडके दिग्दर्शित ‘मुंबई कोणाची’ या लोकनाट्याचे सादरीकरण रविंद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. या नाटकात महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचे अनेक विद्यार्थी सहभागी आहेत.

रविवार, दिनांक १३ रोजी सायं. ४:३० वा. छावा प्रतिष्ठान, सातारा मर्दानी खेळ या दुर्मिळ कलांचे सादरीकरण करतील. त्यानंतर रात्री ७:३० वा. समाजातील वंचित घटकांपैकी एक तृतीयपंथी कलाकार त्यांच्या नृत्य समशेर ठाणे या संस्थेच्या माध्यमातून लावण्य चंद्रा हा नृत्याविष्कार सादर करतील.

सोमवारी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून दुपारी ३ वा. सध्या विविध स्पर्धांमध्ये गाजत असलेला ऑस्करची गोष्ट हा लघुपट दाखवण्यात येईल. त्यानंतर माईम किंग कुणाल मोतलींग आपली कला सादर करेल. सायं. ५ वा. करोना वर आधारित योद्धा हे बालनाट्य संदेश विद्यालय, विक्रोळी सादर करेल. त्यानंतर थिएटर कोलाजचे बालगोपाल चला हसू या हा स्टॅन्डअप कॉमेडीचा कार्यक्रम सादर करतील.

मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. चित्रपटाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर स्वातंत्र्य लढयातील क्रांतिकारक घटनांवर आधारित द प्लॅन या योगेश सोमण लिखित दिग्दर्शित दीर्घांकाचे सादरीकरण स्नेह, पुणे ही संस्था करणार आहे. त्यानंतर अंध कलाकाऱांचा सूर दृष्टी हा सांगीतिक कार्यक्रम कौस्तुभ घैसास आणि सहकारी सादर करणार आहेत.

बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वा. आनंदयात्री हा मराठी साहित्यातील प्रतिभावंतांच्या निवडक कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदिका उत्तर मोने आणि सहकारी सादर करतील. त्यानंतर रात्री ७ वा. कोकणातील सिंधुदुर्ग कुडाळवरून आलेल्या दिनेश गोरे पारंपरिक दशावतार मंडलाचे कलाकार दशावतार सादर करतील.

गुरुवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वा. उज्वल कलामंच ज्येष्ठ नागरिकांचा महाराष्ट्र दर्शन हा पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम सादर करतील त्यानंतर रात्री ७ वा. शुभदा वराडकर, शिष्यगण आणि सहकारी अमृत स्वरूप या नृत्यात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.

शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. अरे संसार संसार हा संत बहिणाबाईंच्या कविता व गीतांवर आधारित संगीतमय कार्यक्रम परिवर्तन जळगांव या संस्थेकडून सादर केला जाणार आहे. रात्री ७ वा. शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान नवी मुंबई हे आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमाहूळ ह्या पारधी समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या विनोदी अंगाने जाणाऱ्या नाटकाचे सादरीकरण केले जाईल.

शनिवार दिनांक १९ नोव्हेम्बर रोजी सायं. ४ वा. हलगी व संबळ यांची जुगलबंदी कृष्णनाथ घुले आणि सहकारी कोल्हापूर हे सादर करतील. यानंतर सायं. ५ वा. नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यास संधी मिळावी म्हणून ओपन कॅफे हा खुला रंगमंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेळी कोणीही कलाकार येथे येऊन आपली कला सादर करू शकतात. त्यानंतर रात्री ७:३० वा नाटयवाडा बीड येथून आलेले कलाकार पाझर या मराठी नाटकाचे सादरीकरण करतील.

रविवार दि २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. पं. शैलेश भागवत यांची मैफल असून त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलरेल असणार आहे. सकाळी ९:३० वा. अकादमीतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धा आणि ओपन कॅफे मध्ये सहभागी होण्यासाठी ७०३९५५२१२६ या भ्रमणध्वनी वर संपर्क करावा. प्रामुख्याने बालदिन साजरा केला जात असून, शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बालचित्रपट महोत्सव असणार आहे. अन्य विविध कार्यक्रमांत अंध विद्यार्थांचा संगीत सौहळा, महाराष्ट्रातील लोककलांचे कार्यक्रम तसेच अन्य विविध कार्यक्रम असतील. त्यानंतर सायं. ४ वा. शहापूरच्या आत्मा मलिक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आदिवासु तारपा नृत्य सादर करतील. पहिल्यांदाच आदिवासी भागातील महाविद्यालय विद्यार्थ्यांना इथे बोलवून सादरीकरण करण्याची संधी दिली आहे. सायं. ५ वा. बँड आणि रवींद्र संगीत हा कार्यक्रम शार्दूल नाईक आणि सहकारी सादर करतील. रात्री ७ वा. मराठी नाट्यसंगीतातील रागदारीचा प्रवास ह्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल.

या महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी केले आहे. सदर महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.


Bundelikhabar

Related posts

आर्थिक मदद मिलने से खुश हुआ परिवार

Bundeli Khabar

जनसेवा हीच ईश्वर सेवा – तानाजी जाधव

Bundeli Khabar

अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे माननीय श्री. प्रविणजी अग्रवाल यांचा सत्कार

Bundeli Khabar
error: Content is protected !!