22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » गांधीच्या आचार-विचारांच्या भरारीला कलाप्रदर्शनाची जोड
महाराष्ट्र

गांधीच्या आचार-विचारांच्या भरारीला कलाप्रदर्शनाची जोड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ १५० वी जयंती साजरी करत असताना पेंटरनेट इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक तसेच ख्यातनाम चित्रकार प्रशांत शहा यांचे “फ्री स्पिरीट ऑफ महात्मा” या शीर्षकाखाली मुंबईच्या जहांगीर कला दालनामध्ये १९ ते २४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भरविण्यात आले आहे.

१९ ऑक्टोबर रोजी या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहूणे म्हणून गांधीजींचे पणतू, गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय तुषार गांधी यांची खास उपस्थिती लाभली होती. त्यांच्याबरोबर कलाक्षेत्रातील सुप्रसिध्द चित्रकार माननीय प्रभाकर कोलते, गांधी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष माननीय नितीन पोतदार, पत्रकार तसेच गांधींच्या साहित्याचे गाढे अभ्यासक माननीय संजय खोरे यांची देखील विशेष उपस्थिती लाभली होती. सदर उद्घाटनप्रसंगी अनेक कलाकार आणि दर्दी कला रसिक प्रदर्शनाला हजर होते.

प्रशांत शहा यांचा चित्रकला, कला संग्रह आणि कला संवर्धनात ४० वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे. त्याचबरोबर ते राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कलाकार आहेत. तसेच प्रतिष्ठित आणि १३० वर्ष कार्यरत असलेल्या ‘द बॉम्बे आर्ट’ सोसायटीचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. या प्रदर्शनात महात्माजींच्या ऐतिहासिक जीवनकथेचे चित्रण केलेल्या ६० पेक्षा अधिक कलाकृती आहेत. या कलाकृतींमध्ये महात्माजींच्या कार्याची भरारी दर्शवण्यासाठी काल्पनिक प्रतीक म्हणून पतंगांच्या आकृतीबंधाचा काल्पनिक तत्त्वावर सुंदर वापर करण्यात आला आहे. महात्मा गांधीचे आचार-विचार, सत्य-अहिंसेचा संदेश त्यांचे रहाणीमान, त्यांचं आचरण हे नव्या पिढीला ज्ञात होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सोशल मिडिया आणि मोबाईलच्या आत अक्षरशः रुतत चाललेल्या तरूणाईला बाहेर येण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच मदत करेल आणि प्रत्येकालाच एक उर्जा देणारं ठरेल, असा विश्वास प्रशांत शहा यांना वाटतो. आणि हे प्रदर्शन बघताना आपल्यालाही त्याची खात्री पटते.

प्रशांत शहा पुढे म्हणाले “आकाशात मुक्तपणे संचार करणारा, तसेच उंच उंच जाणारा हा पतंग म्हणजे भरारीचं प्रतीक आहे. ही भरारी म्हणजे मानवाच्या कर्तुत्वाचं दर्शन घडवून देणारी एक प्रतिकृती आहे. महात्मा गांधींचे साहित्य वाचताना, त्यांचा जीवनप्रवास समजून घेताना पतंगाची भरारी मला त्यांच्यात दिसली आणि तिथूनच या चित्रप्रवासाला आरंभ झाला. या कलाप्रदर्शनातील पहिल्या विभागात महात्माजींच्या जीवनाची कहाणी ग्राफिक आणि वास्तववादी शैलीत कोळसा आणि शाई या माध्यमात करण्यात आली आहे. दुसऱ्या विभागात ‘दांडी यात्रा’ आणि ‘भारत छोडो आंदोलन’ यासारख्या ऐतिहासिक घटनांचा कलात्मक कोलाज आहे. जो रंगीत रेखाचित्रांच्या माध्यमातून रेखाटलेला आहे. तिसऱ्या विभागात नेहरु, पटेल, टागोर यांसारख्या दिग्गजांसह वेगवेगळ्या छबीतील गांधीच्या कलाकृती अॅक्रिलिक रंगाचा वापर करून साकारण्यात आल्या आहेत. चौथ्या विभागात माझ्या अद्वितीय अमूर्त ते वास्तववादी शैली मधील स्थापना आहे. ज्यामध्ये अमूर्त प्रतिमा वास्तववादी शैलीत एका स्टीलच्या गोलाकार आकारावर प्रतिबिंबित होताना दिसतील. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुच्छेद ३७० चांद्रयान आणि प्रदूषण मुक्त भारत यासारख्या समकालीन संकल्पनांचा वापर करुन महात्माजींची प्रासंगिकता दाखविली आहे. या कलाकृती लेह लडाखच्या बर्फाळ निसर्गात आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात देशाची अर्थपूर्ण श्रध्दांजली महात्माजींच्या विशेषतः उद्धोधक आणि मार्मिक आठवणी पुन्हा जागृत करतात. मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा आध्यात्मिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी हे प्रदर्शन प्रभावी ठरु शकेल.”

कलेच्या माध्यमातून प्रशांत शहा यांनी जणू काही लोकांवर भुरळच पाडली आहे. अमूर्त चित्राचं चमत्कारीक असं मूर्त स्वरुप परावर्तित होताना बघून कलारसिकांना अतिशय आनंद होत आहे. हा आनंद केवळ आणि केवळ कलेच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतो. अगदी सर्वसामान्य लोकांच्या चेहर्‍यावरचे हावभाव कॅमेरामध्ये कैद करावेसे वाटतात. म्हणूनच कलेबद्दची अासक्ती आणि जोडीला दिवाळीची सुट्टी यांची गट्टी जमवून विचारांचा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी ह्या कला प्रदर्शनाला भेट द्यायलाच पाहिजे.

Related posts

ठाणे जिले के ४३१ गांवों में से ३५२ गांव कोरोनामुक्त

Bundeli Khabar

वाडा तालुक्यातील गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली

Bundeli Khabar

नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!