38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय*
खेल

भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय*

*मालिका २-१ फरकाने जिंकली*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. आज पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैदराबादच्या क्रीडांगणावर भारताने सलग दुसर्‍यांदा नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

कर्णधार अारोन फिंच आणि कॅमेरुन ग्रीन यांनी खेळास सुरूवात केली. ग्रीन तुफान फलंदाजी करत असताना अक्षर पटेलने टाकलेल्या सामन्याच्या चौथ्या षटकात फिंच ७ धावांवर बाद झाला. त्यावेळी धावसंख्या ४४/१ होती. जोडी फुटल्याचा परिणाम ग्रीनवर झाला. भुवनेश्वरने टाकलेल्या डावाच्या पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकांच्या सहाय्याने केवळ २१ चेंडूंत तडाखेबंद ५२ धावा काढल्या. ग्लेन मॅक्सवेल डोकेदुखी ठरण्यापूर्वीच अक्षर पटेलने त्याला ६ धावांवर धावचीत केले. स्टिव्हन स्मिथला यझुवेंद्र चहलने ९ धावांवर बाद केलं. जोश इंग्लिश आणि टीम डेव्हिड यांनी डावाला आकार देण्यास सुरूवात केली. अक्षरने जोशला २४ धावांवर बाद केलं. त्याच षटकात अक्षरने मॅथ्यू वेडला परतीचा रस्ता दाखवला. डेव्हिड आणि डॅनियल सॅम्स यांच्या जोडीने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यांनी केवळ ४ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. २०व्या षटकात हर्षल पटेलने डेव्हिडला बाद केले. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ५४ धावा काढल्या. तर सॅम्सने नाबाद २८ धावा काढल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १८६/७ असं तगडं आव्हान उभं केलं. विश्वचषकापूर्वी भारतीय गोलंदाजांना कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे अन्यथा भारताला प्राथमिक फेरीदेखील पार पाडणे कठीण जाईल. आजही भुवनेश्वर बुमराह यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेण्यात आला. अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी करत ३३ धावांमध्ये ३ गडी बाद केले.

भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. भारतीय डावाची सुरूवात निराशाजनक झाली. राहुल पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहीत विराट सोबत डावाला आकार देईल असं वाटत असतानाच पॅट कमिन्सने १७ धावांवर रोहितला बाद केले. पुढची १० षटकं विराट आणि सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला. यादवने ५ चौकार आणि ५ षटकारांसह केवळ ३६ चेंडूंत ६९ धावा कुटल्या. त्याला हेझलवूडने बाद केले. स्वतःची आकडेवारी सुधारण्यासाठी खेळत असलेल्या विराटने संथगतीने आपले अर्धशतक झळकावले. त्याला सॅम्सने ६३ धावांवर बाद केले. संघाला विजयी लक्ष्य पार पाडून देण्याची कामगिरी त्याला करता आली नाही. हार्दिकने ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्याने निर्णायक चौकार लगावत सामना भारताच्या पारड्यात टाकला. त्याने नाबाद २५ धावा काढल्या. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला, तर सामन्यासह मालिका २-१ अशी जिंकली.

सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ३६ चेंडूंत ६९ धावा काढल्या होत्या. तर अक्षर पटेलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी२० मालिका २८ सप्टेंबर रोजी केरळच्या क्रीडांगणावर सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. ही ३ सामन्यांची मालिका आहे. त्यानंतर लगेचच साऊथ आफ्रिके विरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

Related posts

राज्यस्तरीय पाँवर लिफ्टींग वरद करमरकरला सुवर्ण पदक

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – पंजाब ५ गडी राखून विजयी

Bundeli Khabar

वेस्ट इंडिजचा भारतावर ५ गडी राखून विजय: मालिकेत १-१ बरोबरी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!