मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषद या शिखर संस्थेच्या सदस्य सचिवपदी डॉ. उमेश अशोक कदम यांची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) नवी दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले उमेश अशोक कदम यांचा भारतीय आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासावर गाढा अभ्यास आहे. भारतीय इतिहासातील त्रूटी दूर करणे तसेच स्थानिक इतिहासाच्या नोंदीवरून अभ्यास करणे, ही त्यांच्या अभ्यासाची वैशिष्ट्ये असून त्याचा उपयोग निश्चितपणे भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या कार्यात होणार आहे. ते सध्या जेएनयूच्या समाजशास्त्र शाखेच्या इतिहास अभ्यास विभागाचे मध्यपूर्व इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्चच्या (एनसीईआरटी) एज्युकेशन रिसर्च अँड इनोव्हेशन कमिटीवरदेखील ते कार्यरत आहेत. त्यांचे इतिहासविषयक अनेक संशोधन अभ्यास निबंध देश-विदेशातील जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या माध्यमातून भारतीय इतिहासाची नवी दालने खुली करण्याचा संकल्प ते निश्चितपणे साकारतील, असा विश्वास इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे. परिषदेची पुणे, बंगळुरु, गुवाहाटी येथे कार्यालये आहेत. या परिषदेच्या सदस्य सचिवपदी कोल्हापूरच्या मराठी अभ्यासकाची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

