36.4 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » भारताचा एकदिवसीय मालिकेवर ३-० असा कब्जा
खेल

भारताचा एकदिवसीय मालिकेवर ३-० असा कब्जा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत २-० अशी अाघाडी घेऊनही शिखर धवनने राखीव खेळाडूंना तिसर्‍या सामन्यासाठी संधी दिली नाही. राखीव खेळाडूंचं मानसिक खच्चीकरण करण्याची ही त्याची पद्धत योग्य नाही. तसं पाहिलं तर पहिले दोन्ही सामने जिंकण्याची संधी वेस्ट इंडिज संघाला होती पण भारताच्या बाजूने फासे पडले आणि मालिकेत विजयी आघाडी मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली.

कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गील यांनी डावाची संथगतीने सुरूवात केली. १०व्या षटकापर्यंत ४५ धावा फलकावर लागल्या होत्या. दोघांनीही समान २२ धावा जोडल्या होत्या. फक्त १ धाव अवांतरची जोडली होती. वेस्ट इंडिजकडून चांगली गोलंदाजी होत होती. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांची अर्धशतकी भागीदारी झाली. १८व्या षटकात शिखर धवनने अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात भारताच्या १०० धावा आणि या दोघांची शतकी भागीदारी असा योग जुळून आला. १०१ धावांमध्ये केवळ ३ धावा अवांतरच्या होत्या. २२व्या षटकात शुभमन गीलने अर्धशतक झळकावले. २३व्या षटकात हेडन वॉल्शने शिखर धवनला ५८ धावांवर बाद केले. अजून एक शतकी भागीदारी करून धवन ११३/१ अशी धावसंख्या असताना परतला. श्रेयस अय्यरने सावध सुरूवात केली. पण २४व्या षटकानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला. जवळपास दोन तासांनी खेळ पुन्हा सुरू झाला. तेव्हा सामना ४० षटकांपर्यत मर्यादित करण्यात आला. भारताने पहिल्या २४ षटकांत केलेली संथ फलंदाजी उरलेल्या १६ षटकांत धावा वसूल करून भरून काढावी लागणार होती. ८५ धावांची भागीदारी करून अय्यर ४ धावांवर बाद झाला. त्याला अकील हुसेनने बाद केले. सुर्यकुमारचा सुर्य अस्ताला गेल्याप्रमाणे तो गेले काही सामने खेळत आहे. त्याला हेडन वॉल्शने बाद केले. गीलच्या नर्व्हस नाईनटीज फटका भारतीय धावसंख्येवर होत होता. ३६व्या षटकात २२५/३ अशी धावसंख्या झळकत होती आणि पुन्हा पाऊस आला. त्याला गीलला बसला. त्याचे पहिलेवहिले शतक होता होता राहिले. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ९८ धावा काढल्या.

नव्या समीकरणामुळे वेस्ट इंडिजला ३५ षटकांत २५७ धावा काढाव्या लागणार होत्या. वेस्ट इंडिजकडून यष्टिरक्षक शाई होप आणि काईल मेयर्स यांनी डावाची सुरूवात केली. महंमद सिराजने दुसर्‍या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर काईल मेयर्सचा त्रिफाळा उध्वस्त केला. तिसर्‍या चेंडूवर शारमाह ब्रुक्सला पायचित टिपत वेस्ट इंडिजची ०/२ अशी केली. शाई होप आणि ब्रॅडन किंग डावाला आकार देण्यास सुरूवात केली. अक्षर पटेलच्या दुसर्‍या षटकात १२ धावा काढत त्यांनी त्यांचे मनसुबे जाहीर केले. महंमद सिराजच्या पुढच्या षटकात ९ धावा काढत त्यांनी धावगती ४.६७ वर पोहचवली. गोलंदाजीत बदल करत धवनने प्रसिद्ध कृष्णाकडे चेंडू सोपवला. कृष्णाच्या षटकात ८ धावा काढत त्यांनी धावगती ५.१४ वर पोहचवली. गोलंदाजीत बदल करत धवनने यझुवेंद्र चहलकडे चेंडू सोपवला. त्याने केवळ ५ धावा दिल्या. डावाच्या १०व्या षटकात यझुवेंद्र चहलने शाई होपला बाद करत ४७ धावांची भागीदारी दुभंगली. वेस्ट इंडिज ४८/३ अशा बिकट अवस्थेत पोहचले. निकोलस पुरन आणि ब्रॅडन किंग पुन्हा भागीदारी रचतील असं वाटत असतानाच अक्षर पटेलने ब्रॅडन किंगचा ४२ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. वेस्ट इंडिज ७४/४ अशा बिकट अवस्थेत पोहचले. शार्दुल ठाकूरने केसी कार्टीला ५ धावांवर बाद केले. निकोलस पुरन चांगला खेळत असताना प्रसिद्ध कृष्णाने त्याला ४२ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात शार्दुल ठाकूरने अकील हुसेनला बाद केले. पुढच्याच षटकात यझुवेंद्र चहलने किमो पॉलला शून्यावर बाद केले. वेस्ट इंडिजला विजयासाठी ६० चेंडूंत १२१ धावांची तर भारताला २ गडी बाद करायची गरज होती. यझुवेंद्र चहलने हेडन वॉल्शला १० धावांवर बाद करत विजय अजून समीप अाणला. त्याच षटकात जयडन सिअल्सला बाद करत चहलने भारतीय संघाचा विजय साजरा केला. वेस्ट इंडिजचा संघ २६ षटकांत १३७ धावा करून परतला होता. भारताने एकदिवसीय मालिकेत ३-० असं निर्भेळ यश मिळवलं. वेस्ट इंडिजवर सलग १२ एकदिवसीय मालिका जिंकण्याचा एक अनोखा विक्रम भारतीय संघाच्या नावावर लागला.

शुभमन गीलला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला पहिला सामना २९ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

Related posts

अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी

Bundeli Khabar

गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!