36.4 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – राजस्थानचा रॉयल विजय
महाराष्ट्र

टाटा आयपीएल – राजस्थानचा रॉयल विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा तिसावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना ७ धावांनी जिंकला. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक १०३ धावा काढल्या. त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याचा सुंदर झेल वरुण चक्रवर्थीने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर टिपला. कर्णधार संजू सॅमसनने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १९ चेंडूंत ३८ धावा काढल्या. शिमरॉन हेटमेअरने बिनबाद २६ धावा काढल्या. देवदत्त पडीक्कलने ३ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १८ चेंडूंत २४ धावा काढल्या. अवांतरच्या १६ धावा पाहता गोलंदाजी कशाप्रकारे झाली असावी याचाही अंदाज येतो. राजस्थान रॉयल्सने २१७/५ असं भलंमोठ्ठं तगडं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं.

कोलकाता नाईट रायडर्सकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८५ धावा काढल्या. त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला यझुवेंद्र चहलने पायचीत टिपले. अॅरोन फिंचने ५८ धावा काढल्या. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. उमेश यादवने १ चौकार दोन षटकारांच्या सहाय्याने केवळ ९ चेंडूंत २१ धावा काढल्या. त्याच्या यष्ट्या ओबेड मेकॉयने वाकवल्या. नितीश राणाने १८ धावा काढल्या. त्याचा झेल जोस बटलरने यझुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर घेतला. यझुवेंद्र चहलने टाकलेलं सामन्याचं १७वं षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरलं. त्याने पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरला ६ धावांवर बाद केलं. चौथ्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरला ८५ धावांवर बाद केलं. पाचव्या चेंडूवर शिवम मावीला शून्यावर परत पाठवलं. सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्सला संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. अशाप्रकारे हॅटट्रिकसह त्याने एकाच षटकात ४ गडी बाद केले. त्याचं गोलंदाजी पृथक्करण ४-०-४०-५ असं होतं. त्यानेच कोलकत्याच्या विजयाचा घास एका झटक्यात काढून घेतला. सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकत्याला विजयासाठी ११ धावांची गरज होती. पण ओबेड मेकॉयने ३ धावांमध्ये २ गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्स १९.४व्या षटका अखेरीस २१० धावांवर सर्वबाद झाले होते.

यझुवेंद्र चहलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४० धावांमध्ये ५ महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. उद्या लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना गुणतक्त्यात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे.

Related posts

अाठवड्याची सुरूवात घसरणीने

Bundeli Khabar

सकल मराठा महासंघातर्फे अडीवळीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Bundeli Khabar

टेंभा गावातील कचर्‍याच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!