23.6 C
Madhya Pradesh
August 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20220307 WA0005
खेल

रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरी

Bundelikhabar

भारताने सामना तिसर्‍या दिवशीच जिंकला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशीच १६ बळी घेत भारताने सामना अलगद खिशात टाकला. विराट कोहलीच्या वैयक्तिक १००व्या कसोटी सामन्यात जाडेजा-अश्विन फिरकीपटूंनी श्रीलंकन फलंदाजांना पळता भूई थोडी करून सोडले आणि भारताने पहिल्या कसोटीत रविवारी श्रीलंकेचा एक डाव आणि १२२ धावांनी पराभव केला. सामन्याचा मानकरी ठरलेल्या रविंद्र जडेजाने फलंदाजी करताना पहिल्या डावात १७५ नाबाद खेळी साकारली होती. श्रीलंकेच्या पहिल्या डावात ४१ धावांत ५ आणि दुसर्‍या डावात ४६ धावांत ४ बळी टिपले. त्याला अश्विन, सामी आणि बुमरा यांनी मोलाची साथ दिली.
श्रीलंकेने कालच्या १०८/४ या धावसंख्येवरून डावाला सुरूवात केली. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या निस्सांकाने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. ११ चौकारांच्या सहाय्याने त्याने ६१ धावा काढल्या. तळाच्या ४ फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर संपला.

फॉलोऑनची नामुश्की ओढवलेल्या श्रीलंकेला दुसर्‍या डावातही अश्विनने स्थिरावू दिले नाही. पहिल्या डावात अर्धशतक झळकवणार्‍या निस्सांकाला त्याने झटपट तंबूचा रस्ता दाखवला. मॅथ्यूज आणि डिसिल्वाची जोडी भेदण्यात रविंद्र जडेजाला यश मिळालं. त्याने डिसिल्वाला ३० धावांवर बाद केलं. असालंका जम बसवतोय असं वाटत असतानाच अश्विनने कोहलीकडे त्याला झेल द्यायला भाग पाडलं. पुढच्याच षटकात डोकेदुखी ठरू पाहणार्‍या मॅथ्यूजला जाडेजाने यष्टीसमोर पायचीत टिपलं. सातव्या क्रमांकावर आलेल्या यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याने ९व्या क्रमांकावर आलेल्या लसिथ एम्बुल्डेनिया याच्या साथीने शर्थीचे प्रयत्न केले. लसिथ एम्बुल्डेनियाने चिवट फलंदाजी करत ४२ चेंडूंत फक्त २ धावा केल्या. त्याला जडेजाने पंतकडे झेल देण्यासाठी भाग पाडले. नाबाद राहिलेल्या निरोशन डिकवेला याने ८१ चेंडूंत ९ चौकरांसह ५१ धावा केल्या. सामी आणि अश्विनने शेपूट झटपट गुंडाळून श्रीलंकेचा डाव १७८ धावांवर संपवला. दुसर्‍या डावात अश्विनने ४ तर सामीने २ बळी टिपले.

रोहित शर्माने कर्णधार पदाची सुरूवात अगदी दणक्यात केली आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवताना त्याने दाखवलेला संयम खूप महत्वाचा आहे. विराट कोहलीच्या वैयक्तिक १०० व्या सामन्यात त्याला वैयक्तिक शतक साधता आलं नाही तरी आजचा विजय हा संघाने त्याच्यासाठी मिळवलेला विजय आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतही बूमराने हेच सूतोवाच केले होते.

कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात १५० पेक्षा जास्त धावा आणि ५ बळी घेणारे खेळाडू:-
१) वीनू मांकड़ (१८४ आणि ५/१९६) इंग्लंड १९५२
२) डेनिस एटकिंसन (२१९ आणि ५/५५) ऑस्ट्रेलिया १९५५
३) पॉली उमरीगर (१७२* आणि ५/१०७) वेस्ट इंडीज १९६२
४) गैरी सोबर्स (१७४ आणि ५/४१) इंग्लंड १९६६
५) मुश्ताक मोहम्मद (२०१ आणि ५/४९) न्यूझीलंड १९७३
६) रविंद्र जडेजा (१७५* आणि ५/४१) श्रीलंका २०२२

पाकिस्तानचे माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांच्या नंतर ४९ वर्षांनी रविंद्र जडेजाने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:-
१) मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) १३३ सामने ८०० बळी
२) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) १४५ सामने ७०८ बळी
३) जेम्स अँडरसन (इंग्लंड) १६९ सामने ६४० बळी
४) अनिल कुंबळे (भारत) १३२ सामने ६१९ बळी
५) ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) १२४ सामने ५६३ बळी
६) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) १५२ सामने ५३७ बळी
७) कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) १३२ सामने ५१९ बळी
८) डेल स्टेन (साऊथ आफ्रिका) ९३ सामने ४३९ बळी
९) रविचंद्रन अश्विन (भारत) ८५ सामने ४३६ बळी
१०) कपिल देव (भारत) १३१ सामने ४३४ बळी

रविचंद्रन अश्विन याने भारताचे माजी जलद गोलंदाज कपिल देव यांना मागे करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये अव्वल १० जणांमध्ये ‍जागा पटकावली. अश्विनने सामन्यात ६ बळी टिपले.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय

Bundeli Khabar

राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप सांगलीत रंगणार

Bundeli Khabar
error: Content is protected !!