31.7 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » दिल्लीच्या संघाला शेवटच्या १३ चेंडूत १३ धावा करता आल्या नाहीत, गुजरात ११ धावांनी विजयी
महाराष्ट्र

दिल्लीच्या संघाला शेवटच्या १३ चेंडूत १३ धावा करता आल्या नाहीत, गुजरात ११ धावांनी विजयी

प्लेऑफसाठी चुरस कायम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीगच्या १४ व्या सामन्यात गुजरात जायंट्सने रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ११ धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून १४७ धावा केल्या. एल. वोल्वार्ड्टने ५७ आणि एश्ले गार्डनरने नाबाद ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद १३६ धावांवर आटोपला.

या विजयासह गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दोन विजय आणि चार पराभवांसह सहा सामन्यांतून चार गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यास असमर्थ ठरला. त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे. दिल्ली सहा सामन्यांत चार विजय आणि दोन पराभव आणि आठ गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

सामन्यात एकावेळी दिल्लीच्या आठ विकेट्सवर १३५ धावा झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना १३ चेंडूत १३ धावांची गरज होती. त्यावेळी अरुंधती रेड्डी आणि शिखा पांडे खेळपट्टीवर होत्या आणि दोघींमध्ये ३५ धावांची भागीदारी झाली. यानंतर किम गर्थने अरुंधती रेड्डीला बाद करत सामना उलटवला. रेड्डी १७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २५ धावा करून बाद झाली. यानंतर पुढच्याच षटकात गार्डनरने पूनम यादवला (०) बाद करत गुजरातला विजय मिळवून दिला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून १४७ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मारिजाने कैपने सोफिया डंकलेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डंकले चार धावा करू शकली. यानंतर एल. वोल्वार्ड्ट आणि हरलीन देओल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी जेस जोनासेनने मोडली. तिने हरलीन देओलला यष्टिरक्षक तानिया भाटियाकरवी झेलबाद केले. यानंतर एश्ले गार्डनरने वोल्वार्ड्टसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने ही भागीदारी तोडली. तिने वोल्वार्ड्टला त्रिफळाचीत केले. एल. वोल्वार्ड्टला लिलावात कोणत्याच संघाने घेतले नव्हते. मात्र, बेथ मुनीच्या दुखापतीमुळे वोल्वार्ड्टचा गुजरात संघात समावेश करण्यात आला. आता ती संघासाठी महत्त्वाची खेळाडू ठरत आहे. लीगमधील तिच्या दुसऱ्याच सामन्यात वोल्वार्ड्टने अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत ५७ धावा करून ती बाद झाली. या खेळीत तिने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

नुकत्याच झालेल्या महिला टी२० विश्वचषकात वोल्वार्ड्ट सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिच्याशिवाय एश्ले गार्डनरनेही तुफानी खेळी खेळली. गार्डनरने ३३ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या. दिल्लीकडून जोनासेनने दोन गडी बाद केले. त्याचवेळी मारिजाने कैप आणि अरुंधती रेड्डी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यामध्ये कर्णधार मेग लैनिंग (१८), अॅलिस कॅप्सी (२२), मारिजाने कैप (३६) आणि अरुंधती रेड्डी (२५) यांचा समावेश आहे. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. शफाली वर्मा (८), जेमिमा रॉड्रिग्स (१), जेस जोनासेन (४), तानिया भाटिया (१), राधा यादव (१), पूनम यादव (०) फार काही करू शकल्या नाहीत. शिखा पांडे आठ धावा करून नाबाद राहिली. गुजराततर्फे किम गर्थ, तनुजा कंवर आणि गार्डनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी कर्णधार स्नेह राणा आणि हरलीन देओलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

एश्ले गार्डनरला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता १८ मार्चला मुंबई विरुद्ध युपी सामना दुपारी ३:३० वाजता डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर तर संध्याकाळी ७:३० गुजरात संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी २० तारखेला दुपारी ३:३० वाजता गुजरात विरुद्ध युपी सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर तर दिल्लीचा संघ मुंबई इंडियन्सशी संध्याकाळी ७:३० वाजता डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर येथे भिडणार आहे. १८ आणि २० मार्च रोजी दुहेरी हेडर सामने म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळवले जातील.

Related posts

प्राजक्ता चौधरी ठरल्या ‘नारी तू नारायणी रत्न’ पुरस्कार विजेत्या

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री नारायण राणे के बयान को लेकर पूरे महाराष्ट्र में आंदोलन शुरू

Bundeli Khabar

वाचन मंदिर भिवंडीतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा,मुलांनी वाचनाची सवय सातत्याने ठेवावी:शिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!