21.8 C
Madhya Pradesh
September 17, 2024
Bundeli Khabar
Home » मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीद्वारे स्ट्रोक रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार पुरवठा
महाराष्ट्र

मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीद्वारे स्ट्रोक रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार पुरवठा

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई : स्ट्रोक हे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे दुसरे प्रमुख कारण असून त्यांची संख्या १६ दशलक्ष आहे. 1 भारतात दरवर्षी अशा अंदाजे १.८ दशलक्ष केसेस होतात. भारतात स्ट्रोक हे मृत्यू आणि व्यंगाचे प्रमुख कारण आहे. 2 दरवर्षी भारतात अंदाजे ०.६९ लोक स्ट्रोकमुळे मृत्यूमुखी पडतात.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील इंटरव्हेन्शन्ल न्यूरोरेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मनीष श्रीवास्तव याविषयी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. स्ट्रोकमुळे केवळ रुग्णावरच परिणाम होतो असे नाही, तर निरोगी आयुष्याचा महत्त्वाचा काळ वाया जाऊन संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते. अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे, की दरवर्षी निरोगी आयुष्याची ११६ दशलक्ष वर्ष स्ट्रोकशी संबंधित मृत्यू आणि अपंगत्वामुळे वाया जातात.’
एक केस समजावताना डॉ. श्रीवास्तव म्हणाले, ‘बॅटमिंटन खेळताना एका २९ वर्षीय मुलाला मानेत अचानक दुखायला लागलं आणि त्यानंतर त्याची अंशतः दृष्टी गेली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन मेंदूचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यात मेंदूच्या (मेंदू पेशी) मुख्य भागांना रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत (बसिलियर आर्टरी) ब्लॉकेज असल्यामुळे स्ट्रोकचे निदान निश्चित करण्यात आले. एमआरआयनंतर शुद्ध हरपून तो बेशुद्ध पडला. रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्यावर तातडीने एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया (मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमी) करण्यात आली आणि रक्तवाहिनी उघडण्यात आली. त्यानंतरच्या आठवड्यात रुग्णांने चांगली प्रगती केली व तो आता पूर्णपणे व्यवस्थित आहे. परत स्ट्रोक येऊ नये यासाठी काही आठवड्यानंतर त्याच्या रक्तवाहिनीमधील विच्छेदन केलेल्या भागात प्रवाह वळवण्यासाठी डायव्हर्टर बसवण्यात आला. तेव्हापासून तो नेहमीसारखे आयुष्य जगत आहे.’
धूम्रपान, अती मद्यसेवन, कोकेनसारख्या ड्रग्जचे सेवन, कमी शारीरिक हालचाल यांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय हायपरटेन्शन, हृदयाचे आजार, स्थूलत्व, अनुवंशिकता यांसारख्या सह-व्याधी असल्यासही जोखीम वाढते व आरोग्यावर देखरेख करणे गरजेचे ठरते. परिस्थितीच्या गांभीर्यानुसार रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी सुरुवातीच्या काही तासांत उपचार मिळणे आवश्यक असते. उपचारांत दिरंगाई झाल्यास कधी न भरून येणारी हानी होऊ शकते किंवा जीवही गमवावा लागू शकतो.
‘लगेच उपचार करण्याचा अवधी कमी असल्यामुळे लक्षणे माहीत करून घेणे फार महत्त्वाचे आहे. रुग्णाला जितक्या लवकर उपचार मिळतील, तितकी त्याचे रोगनिदान चांगले होते. जास्त जोखीम असलेल्या गटातील लोकांना बोलणे, आकलन, हात किंवा पाय हलवण्यात अडथळा येत असेल, तर तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते. ट्रान्झिट इस्केमिक अटॅक झाल्यास कधी कधी लक्षणे आपोआप नाहीशी होण्याची शक्यता असते, त्यामुळे लक्षणे दिसत नसली, तरी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन तपशीलवार परीक्षण करणे महत्त्वाचे असते,’ असेही डॉ. मनीष म्हणाले.
गाठी (क्लॉट्स) विरघळवणाऱ्या औषधांद्वारे उपचारांसाठी केवळ ४.५ तासांचाच अवधी मिळत असल्यामुळे तो वाढवण्यासाठी तसेच स्ट्रोकच्या दुष्परिणामांवर उपचार केल्यानंतर जास्त चांगले रिझल्ट मिळावेत या उद्देशाने नवनवीन तंत्रांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तीव्र इस्केमिक स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या गाठींच्या उपचारांसाठी गेल्या काही वर्षांत मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीला पसंती मिळत आहे.
मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीविषयी डॉ. मनीष म्हणाले, ‘मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीचा मोठ्या गाठींसाठीची उपचारपद्धती म्हणून स्वीकार केला जात आहे, कारण त्यामध्ये उपचारांसाठी जास्त वेळ मिळतो तसेच गाठ पूर्णपणे काढून टाकणे शक्य होते. लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर ० ते २४ तासांत स्ट्रोकच्या रुग्णावर वैद्यकीय उपचार केले असले किंवा नसले, तरीही मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमी करता येते. मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमी केलेल्या रुग्णांमध्ये मोठी घट दिसून आली व त्यामध्ये रेडिओग्राफिकच्या मदतीने खास उपकरणाला गाठ असलेली जागा शोधून ती कायमची काढून टाकण्यासाठी व मेंदूला होणारा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

Related posts

डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ‘लस वाहिका’ मार्गस्थ

Bundeli Khabar

आपला समाज लोकाभिमुख कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत – मणीलाल शिंपी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!