24.3 C
Madhya Pradesh
September 24, 2023
Bundeli Khabar
IMG 20230501 WA0025
महाराष्ट्र

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र संगीत नाट्यमहोत्सवातून अवतरला रंगभूमीचा वैभवशाली कालखंड

6 / 100

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आणि तिचा वैभवशाली कालखंड रसिकांना अनुभवण्यास मिळाला तो दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत नाट्य महोत्सवातून. संगीत शारदा, संगीत स्वयंवर आणि संगीत मदनाची मंजिरी या तिन्ही संगीत नाटकांना प्रेक्षकांची एकच गर्दी अनुभवण्यास मिळाली. संगीत नाटकांना परत चांगले दिवस यावेत यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र ही संस्था गेली १५ वर्षे तीन संगीत नाटकांचा महोत्सव दर वर्षी साजरा करत आहे.
गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘संगीत शारदा’ हे नाटक पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेने सादर केले. हे नाटक त्या काळातील जरठ-बाल विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्दही जेव्हा अस्तित्वात नव्हता अशा काळात ‘शारदा’मधील स्त्रीपात्रं स्त्रीशक्तीचा एल्गार व्यक्त करतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची कशी फरफट होते याचं दर्शन यात घडतं. अव्यक्त प्रेम, गैर ठिकाणची निष्ठा, समवयस्कांमधला मैत्रभाव, सज्जनांची कुचंबणा यात अनुभवण्यास मिळाली. ओघवती भाषा, गमतीदार व गंभीर यांची गोफस स्वाभाविकता, स्वभावचित्रण आणि पात्रभाषा यादृष्टीने हे नाटक विशेष रंगले.
कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित पुणे येथील कलाद्वयी संस्थेने सादर केलेले “संगीत स्वयंवर’ हे मूळ बालगंधर्व यांचे नाटक म्हणून ओळखले जाते. संगीत मराठी रंगभूमीवरचे सर्वात श्रीमंत नाटक आहे. अभिजात भारतीय संगीत घराघरात पोहोचवण्याचं श्रेय या नाटकाकडे जाते. “नाथ हा माझा, मोही मना’, “मम आत्मा गमला, एकला नयनाला’, “मम कृष्ण सखा रमा’ ही पदं रसिकांच्या मनाचा ठाव घेत होती. त्याला वन्स मोअर मिळत होता. सर्व पदांना पं. भास्करबुवा बखले यांनी चाली दिल्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या रागातल्या बंदिशींचा उपयोग करून चाली बांधल्या होत्या. त्या सगळ्या चाली रसिकांना मान डोलायला लावणाऱ्या आहेत. त्याचा प्रत्यय या नाटकाच्या सादरीकरणातून आला.
पुणॆ येथील कलाद्वयी या संस्थेतर्फे कै. विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ने महोत्सवाचा समारोप झाला. कै. विद्याधर गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांचे नाटक सादर करून संस्थेने त्यांना स्मरणांजली वाहिली. नाविन्यपूर्ण आणि भावपूर्ण चालींचा साज असलेले ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’ अशी एकाहून एक सरस नाट्यपदे. गझल गायकीच्या अंगाने सादर केलेले ‘ये मौसम है रंगीन’मुळे ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाला रसिकांनी उस्फूर्त टाळ्यांची दाद दिली. ज्या काळात संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागले. ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाट्य आहे.

Related posts

विकलांग डिब्बों में यात्रा कर रहे यात्रियों पर करवाई

Bundeli Khabar

ऑडी इंडियाने आकर्षक रूपातील ‘ऑडी क्यू५’ लॉन्च केली

Bundeli Khabar

पंधरा गावातील महिला अन्नपाण्याविना बेचैन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!