33.8 C
Madhya Pradesh
April 23, 2025
Bundeli Khabar
Home » गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून विजय
खेल

गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून विजय

*दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील सलग दुसरा पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएलच्या १६व्या हंगामातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना गतविजेत्या गुजरात टायटन्सने सहा गडी राखून पराभूत केले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ विकेट गमावत १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.२ षटकांत ४ गडी गमावत १६३ धावा करून सामना जिंकला. स्पर्धेत आतापर्यंत पहिल्या डावात फलंदाजी करणार्‍या संघाने १७० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. पण आज दिल्लीला ही मजल मारणे शक्य झाले नाही.

चालू मोसमातील गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे. त्यांनी उद्घाटनाच्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव झाला आहे. गेल्या सामन्यात ते लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभूत झाले होते.

गुजरातचा पुढील सामना रविवारी (९ एप्रिल) अहमदाबादमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. त्याचवेळी दिल्लीला शनिवारी (८ एप्रिल) गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचे आहे.

२० वर्षीय फलंदाज साई सुदर्शनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. सुदर्शनने ४८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. डेव्हिड मिलरने १६ चेंडूत ३१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. विजय शंकरने २३ चेंडूत २९ धावा केल्या. त्याला प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी १४-१४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने पाच धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिच नॉर्टजेने दोन गडी बाद केले. खलील अहमद आणि मिचेल मार्श यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

सततच्या धक्क्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने १६२ धावा केल्या. त्याच्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३२ चेंडूत ३७ तर उपकर्णधार अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. सर्फराज खान ३० आणि अभिषेक पोरेलने २० धावा करून बाद झाले. दिल्लीचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी भेदक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन विकेट मिळाले.

साई सुदर्शनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related posts

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा योजनाबद्ध विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – चेन्नई सुपर किंग्सने मिळवला ह्या मोसमातील मोठा विजय

Bundeli Khabar

Maharashtra Judo Association’s state level competition Spectacular performances by Raghav Senthilwell, Muzaffar Farooq, Yash Mukesh

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!