*अॅड.आप्पासाहेब देसाई, नंदकुमार काटकर यांना*
*विश्वनाथ वाबळे स्मृती समाजभूषण पुरस्कार*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तर नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेले प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. आप्पासाहेब देसाई तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार व शिवनेरकार विश्वनाथ बावळे स्मृतिप्रित्यर्थ सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले तसेच ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे उपस्थित होते.
अॅड. आप्पासाहेब देसाई हे शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअऱिंग, आर्किटेक्ट, अॅप्लाईड आर्ट, व्हिज्युअल आर्ट तसेच विधि महाविद्यालयांची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी ते संबंधित आहेत. त्यांनी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्यासाठी न्यायलयीन खटले यशस्वीपणे लढवले आहेत. त्याबद्दल त्यांनी शिक्षक संघटनांच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नंदकुमार काटकर हे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून मुंबई बँकेचे संचालकदेखील आहेत. त्यांनी सहकार आणि शैक्षणिक केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.