मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभियंता विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक विषयाचे ज्ञान अधिक वाढीस लागावे, या उद्देशाने शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत अभियंता तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण उपक्रम राबविला जात आहे. यानिमित्ताने अभियंता विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना तसेच त्याची पूर्तता कशी करावी, याविषयी अभ्यासात्मक माहिती सादर करावयाची आहे. संस्थेचे जनरल सेक्रेटरी व प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अप्पासाहेब देसाई तसेच अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याशिवाय विद्यार्थ्यांना भावी आय़ुष्यात नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी त्या प्रक्रियेची तयारी करण्यासाठी आयबीएम स्कील बिल्ड हा उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मार्गदर्शन तसेच मुलाखतीचे तंत्र शिकविण्यात येईल. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नोकरी संधी विभागाचे प्रमुख स्वप्नील देसाई यांनीदेखील मॉक इंटरव्ह्यू हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.