राकेश चौबे
कल्याण : एका १८ वर्षीय तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेला घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक तरुणीचे लैंगिक अत्याचार करतानाचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सात महाविद्यालयीन तरूण, एक तरूणी, अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
दीड वर्षांपासून तरुणीला त्रासमृतक तरुणी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इमारतीत कुटुंबासह राहात होती. ती कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्या सोबतच तिची मैत्रिणी आणि सात मित्र असा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होता. दीड वर्षांपासून हे आरोपी सात तरूण, आणि एक तरुणी मिळून मृतक तरुणीला विविध कारणाने त्रास देत होते. शिवाय तिच्या साधेपणाचा गैरफायदा घेत आरोपी तरूणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच अत्याचार करतानाचे अश्लील व्हिडिओ आरोपी तरूणांनी तयार केले होते. गेल्या दीड वर्षापसून हेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आठही आरोपी तिला वारंवार देत होते. यामुळे ही मृतक अस्वस्थ होती, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.म्हणून केली आत्महत्या – अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर आपली, कुटुंबाची बदनामी होईल. घरात हा प्रकार समजला तर आपणास कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती या तरुणीला होती. त्यामुळे नैराश्य आलेल्या तिने काटेमानिवली येथील राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजलावरून उडी मारून आत्महत्या केली. सोसायटीच्या आवारात मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी बाहेर आले. त्यावेळी त्यांना तरूणीने आत्महत्या केल्याचे समजले. या प्रकरणात कुटुंबीयांच्या माहितीवरून पोलिसांनी सात तरूण, एका तरूणीविरुध्द मानसिक त्रास देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे कायद्याखाली आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करून आज ( 15 जून ) त्यांना अटक केली आहे. आज दुपारच्या सुमारास आठही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बशीर शेख यांनी दिली.