34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईत निधन
महाराष्ट्र

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईत निधन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे अनेक आरोग्य समस्यांमुळे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले, त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

“बप्पी लाहिरी यांना महिनाभरापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि सोमवारी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना त्यांच्या घरी बोलावले. त्यांची गंभीर परिस्थिती पाहून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) मुळे त्याचा मृत्यू झाला,” असे रूग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी सांगितले.

गेल्या वर्षी, बप्पी दांना कोविड -१९ चे निदान झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये, त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलचे वृत्त खोडून काढले होते, “मी माझा आवाज गमावला आहे, अशा आशयाचे वृत्त पाहून मला धक्का बसला आहे. हे खोडसाळ आणि खूपच हास्यास्पद आहे आणि मी ह्या वृत्तांनी खरोखरच खूपच दुःखी आहे.”

बप्पी दा त्यांच्या हिट गाण्यांसाठी जितके प्रसिद्ध होते तितकेच ते सोन्याच्या आकर्षणासाठीही त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. १९७४ मध्ये दादू ह्या बंगाली चित्रपटाला संगीत देऊन त्यांनी सुरूवात केली होती. ताहिर हुसैन यांच्या जख्मी आणि १९७६ च्या चलते चलते या चित्रपटांनी त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बस्तान बसवलं. बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते, कमांडो, आज के शहेनशाह, ठाणेदार, नंबरी आदमी आणि शोला और शबनम यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी रचली.

गेल्या दशकात, बप्पी दांनी द डर्टी पिक्चर चित्रपटासाठी ऊह ला ला, गुंडे चित्रपटासाठी तूने मारी एन्ट्री, बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटासाठी तम्मा तम्मा आणि अगदी अलीकडे शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटासाठी अरे प्यार कर ले सारखी गाणी गायली. २०२० मध्ये आलेल्या बागी ३ चित्रपटासाठी त्यांनी तयार केलेले भंकस हे गाणे त्यांचे शेवटचे गाणे ठरले.

एका मुलाखतीत बोलताना, जुन्या सुप्रसिद्ध गीतांना पुन्हा तयार करण्याच्या ट्रेंडबद्दल बोलले होते. तेव्हा ते भावनिक होऊन म्हणाले, “बद्रीनाथ की दुल्हनियामधील माझ्या जुन्या तम्मा तम्मा गाण्याच्या रिक्रिएशनपासून ट्रेंडची सुरुवात झाली. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. जनतेची निवड ही सर्वोच्च निवड आहे. जनता हे माझे सर्वस्व आहे.”

बप्पी लाहिरी शेवटचे बिग बॉस १५ मध्ये दिसले होते. तिथे ते त्यांचा नातू स्वस्तिकच्या बच्चा पार्टी ह्या गाण्याच्या प्रमोशनसाठी आले होते. बिग बॉसमध्ये ही त्यांची पहिली आणि शेवटची उपस्थिती होती.

बप्पी दांनी अनेक वर्षे संगीत उद्योगावर राज्य केले. १९७०-८० च्या दशकाच्या काळात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी आणि संगीत दिले. आय एम अ डिस्को डान्सर, रात बाकी, पग घुंगरू, बंबई से आया मेरा दोस्त, नैनो में सपना, ताकीताकी, हमको आज कल हैं इंतेझार, तम्मा तम्मा, याद आ राहा है, यार बिना चैन कहां रे, यांसारखी अनेक सुंदर सुप्रसिद्ध गाणी त्यांनी तयार केली.

१९८५ मध्ये शराबी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला होता. तर २०१२ मध्ये द डर्टी पिक्चर चित्रपटाच्या ऊह ला ला या गीतासाठी त्यांना मिर्ची संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०१८ मध्ये फिल्मफेअरने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता.

Related posts

श्रमिकों के लिए सम्राट अभय थोराट का ई श्रम कार्ड पंजीकरण अभियान

Bundeli Khabar

मा.ना. कपिल पाटील यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधुन मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे भिवंडीत आयोजन!

Bundeli Khabar

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी महिलांना भाऊबीज व दीपावली ची भेट

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!