ब्यूरो/ महाराष्ट्र
टिटवाळा : जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्याकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविकांना भाऊबीजेच्या दिवशी कृतज्ञतेची भाऊबीज या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात अत्रे रंगमंदिर येथे १६८ आशा सेविकांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात अशा सेविकांनी समाजामध्ये जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना झालेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे. कोरोना पेशंट शोधण्यापासून ते रुग्णाला ॲडमिट करेपर्यंत तसेच त्याला संपूर्ण उपचार व औषधे उपचार मिळण्याची जबाबदारी शासनाने अशा सेविकांवर सोपवली होती. अशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता न घाबरता कोरोना काळात आपली प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. या कार्याची दखल घेऊन जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी या भगिनींनी सामाजिक भावनेतून त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून कृतज्ञतेची भाऊबीज हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षी पाचशे आशा सेविकांना पैठणी साड्यांचे वाटप केले या वर्षी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दहा हजार अशा सेविकांना पैठणी साडीची भेट देण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आशा सेविकांनी प्रचंड प्रतिसाद देत अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी १६८ हून अधिक आशा सेविकांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले. कोरोणा सारख्या कठीण परिस्थितीत आम्ही काम करून सुद्धा आमच्या कार्याची कोणीही दखल घेत नव्हते परंतु आमचे मोठे भाऊ निलेश सांबरे यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला आज पैठणी दिल्यामुळे खूप आनंद झाला आहे आम्ही जिजाऊ संस्थेचे खूप आभार व्यक्त करतो असे येथील उपस्थित आशा सेविकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
“आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे काहीतरी देणकरी लागतो, सर्व समाजाचे आपल्यावर असंख्य ऋण असतात ते ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून स्वकमाईतून समाजाची सेवा करण्याचं ध्येय निलेश सांबरे यांचे असून आरोग्य, शिक्षण, कला-क्रीडा, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने विविध उपक्रम राबवत असून समाजाचा विकास करणे हेच एकमवे ध्येय असून मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था कर्तव्य पार पाडत आहे.”
या प्रसंगी जिजाऊ संस्थेचे प्रज्वल पाटील , माजी नगरसेविका विजया पोटे , सामाजिक कार्यकर्ते संजय पारेकर, नाभिक समाज अध्यक्ष अविनाश सोनवणे , समाजसेवक संदीप तरे, पत्रकार संभाजी मोरे, माजी नगरसेवक अरविंद पोटे, आरोग्य विभाग अधिकारी रितेश जाधव, जिजाऊ संस्थेचे टिटवाळा शाखा अध्यक्ष कुणाल खिस्मतराव, मनसे शाखाध्यक्ष संदीप पंडित यासह ठाणे जिल्ह्यातील जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.