32.7 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » वयाच्या १८ व्या वर्षी आपण सज्ञानी होतो म्हणजे नक्की काय: वैष्णवी बांगरे
महाराष्ट्र

वयाच्या १८ व्या वर्षी आपण सज्ञानी होतो म्हणजे नक्की काय: वैष्णवी बांगरे

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र

अद्वैत तत्वाप्रमाणे मन, शरीर आणि आत्मा यांचा सुसंवादी विकास म्हणजे मनुष्याचे माणूस म्हणून घडणं होय. माझ्या मते जेव्हा आपण माणूस म्हणून खर्‍या अर्थाने घडू तेव्हा आपण सज्ञानी झालोय समजावं. अठरा वर्ष पूर्ण झाली की तरूणाईच्या  सळसळत्या रक्तात एक वेगळीच उर्जा निर्माण होते. स्वत:च्या स्वप्नांना आकार देण्याची संधी त्यांना मिळते. अठराव्या वर्षी तरूणांना अनेक अधिकार मिळतात. पण या अधिकारांची किंमत, या अधिकारांचे महत्व जेव्हा तरूणांना समजेल तेव्हा ते सज्ञानी होणार. आपल्या अधिकारांबाबत आजच्या तरूणांनी जागरूक झालं पाहिजे। सज्ञानी होणं म्हणजे नेमकं काय हो? सज्ञानी होणं म्हणजे मला वाटतं, समाजात आणि देशात घडणार्‍या प्रत्येक बर्‍या-वाईट घटनांविषयी मनात निर्माण होणारी एक जाणीव. आपल्याला मिळणार्‍या प्रत्येक अधिकारांविषयी संपूर्ण माहिती आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग कसे करायचे हे समजणं. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक  अनुभवातून नवीन काहीतरी शिकता येणं म्हणजे सज्ञानी होणं।
     

अठरा वर्ष पूर्ण झाली की तरूणांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळतो. आई-वडीलांच्या उबदार सावलीतून बाहेर पडून जगाला सामोरे जाण्याचं हे वय असतं. या वयात काही तरी मोठं करण्याची धडाडी निर्माण होते. पण सोबतच जबाबदारी ही अंगावर येते. आजच्या युगातला तरूण हा प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलू शकतो; म्हणजे तो स्वावलंबी होऊ शकतो. आजची तरूणपिढी ही खरंच स्वावलंबी होऊ पाहतेय. या स्पर्धेच्या युगामुळे सुद्धा आजच्या पिढीला स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. फक्त गरज आहे ती आई-वडीलांच्या पाठिंब्याची. जो पाठिंबा नेहमी सावली प्रमाणे आपल्या सोबत असतो. आई-वडीलांसाठी आपली मुलं कितीही मोठी झाली तरी ते लहानच असतात. पण ती मुलं नेहमीच लहान नाही राहू शकत ना. जसं पाण्यात पडल्यावर माणूस हातपाय मारून पोहायला शिकतो. तसंच या जगात जो स्वत:चे हातपाय मारून स्वत:च जगायला शिकतो तो सज्ञानी होतो.   
   

एक  १८ वर्षे पूर्ण झालेली मुलगी असते. तिचे १८ वर्षे नुकतेच पूर्ण झालेले असतात आणि तिच्या हातून एका ज्येष्ठ पुरूषाचा खून झालेला असतो. ती तिच्या वडीलांसोबत बोलत होती. तिच्या बोलण्यातून तिची हतबलता प्रकर्षाने  जाणवत होती. ती तिच्या वडिलांना म्हणाली, ”गेली अनेक वर्षे संबंधित व्यक्ती तुमच्या अनुपस्थितीत माझे लैंगिक शोषण करत होती. पण या सर्व गोष्टींबद्दल मी कोणाकडे बोलू आणि कोणाकडून संरक्षण मागू? याची माहितीच मला नव्हती. शेवटी असहाय्य होऊन मी त्याचा खून केला.” त्या मुलीने १८ वर्षे नुकतीच पार केलेली. म्हणून ती कायद्याच्या दृष्टीने सज्ञान ठरली आणि या कालावधीत तिच्या हातून खून झाल्यामुळे ती गुन्हेगारही ठरणार आहे. पण अल्पवयात झालेल्या अत्याचाराबाबत आणि त्यावेळी ठाऊक नसलेल्या संरक्षणाबाबतची शिक्षा तिला आत्ता भोगावी लागणार आहे. सांगायचा मुद्दा हा की, मुलांना त्यांच्या संरक्षणाबाबत लहानपणापासूनच योग्य ती माहिती देणं, अधिकारांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत खर्‍या अर्थाने ते कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सज्ञानी होणार.
अठरा वर्ष वयाबरोबर मुलं फक्त शरीराने नव्हे तर बुद्धी आणि विचारांनी सुद्धा परिपक्व होतात.

अठरा वर्ष पूर्ण होत आली की आजची पिढी स्वत:च्या पायावर उभं होण्याचा प्रयत्न करते. स्वावलंबी होऊ पाहतेय. आज अनेक तरूण मुला-मुलींना वाटतं की मी माझ्या शिक्षणासोबतच घरच्यांना मदत करावी. उदाहरण तर मी माझं स्वत:चच देऊ शकते. मी आज अठरा वर्ष पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नेहमीच वाटतं की मी माझ्या परीवारासाठी कधी, काय करणार? माझ्या आईवडिलांना, दादाला मी केव्हा आर्थिकरित्या आणि ईतर मदत करणार? आजही मला जे जमते ती मदत करण्याचा प्रयत्न करते. घरची परिस्थिती समजून घेऊन जिथे काटकसर करता येईल तिथे काटकसर करण्याचा प्रयत्न करते. हिरा हा खूप झिजल्यानंतरच चमकतो. आज कष्ट केले तर उद्या फळं चाखायला मिळतील. जसजसं वय वाढत जातं तसतसं जबाबदारीची जाणीव होऊ लागते. हे जीवनाचं कोडं समजत जाणं म्हणजे सज्ञानी होणं.
असं म्हणतात की परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवते. परिस्थितीमुळे काही काही कुटुंबात लहान वयात मुले मोठी होतात. जबाबदारीची जाणीव त्यांना होते. पण लहान मुलांचं मन म्हटलं की मौजमजा करायची इच्छा होणारच. पण जसं ते मोठे होतात त्यांना आपल्या परिस्थितीची, जबाबदारीची जाणीव होते. त्यांना मिळणार्‍या प्रत्येक अधिकाराची माहिती होते आणि त्या अधिकारांचा ते प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात योग्य तो वापर करतात. म्हणजे ते सज्ञानी होत असतात.

अठरा वर्ष पूर्ण झाली की खूप जणांना हवेतच उडल्यासारखं वाटतं. सर्व प्रकारे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळतात ना. खूप मोठं झाल्यासारखं ते वागतात. लहानपणापासून ज्या आईबाबांचं बोट पकडून आपण चालत आलोय. त्यांचं बोट अचानक अठरा वर्षानंतर सोडून दिलं तर आपण खरंच चालणार का? मला असं म्हणायचं नाही आहे की आईबाबावरच अवलंबून राहा. पण आजची परिस्थिती बघितली तर सांगावंसं वाटतं, खूप मुलं- मुली आज आपल्या आई-वडिलांनाच मी मोठा झालोय, मी माझं स्वत:चं स्वत:च करू शकतो, मला तुमची गरज नाही, या शब्दांत बोलतात. आज अनेक तरूण मुलंमुली शाळा-कॉलेज च्या नावाखाली घरी खोटं बोलून बाहेर फिरायला जातात. प्रेमात आंधळे होऊन ध्येयापासुन विचलित होतात. ज्या वयात आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असतं, त्या वयात त्यांचं मन भरकटत असतं. हे सज्ञानी होण्याचं लक्षण तर नाही पण हीच आजची सत्य परिस्थिती आहे. बारावीचं वर्ष आणि अठरावं वर्ष एकच. यानंतर आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडू शकतो. या वयात ज्याला आपलं ध्येय उमगलं, जो स्वत:च्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे जिद्दीने प्रयत्न करायला शिकला. तो सज्ञानी होत आहे समजावं.
बरोबरचे १८ वर्ष पूर्ण होत नाही नी आजची तरूण मंडळी लव यू, मिस यू, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही असं म्हणतेय. या ऐवजी मला माझ्या आयुष्यात माझं ध्येय प्राप्त करायचं आहे. मी माझ्या ध्येयप्राप्तीशिवाय राहू शकत नाही. माझं जीवन, माझं ध्येय आहे. असं जो तरूण या वयात बोलून ते कृतीत उतरवत असेल तो खर्‍या अर्थाने सज्ञानी होत आहे. एक झाड त्याच्या पानं, मुळं आणि बाकी अवयवांमुळे स्वयंपूर्ण होतो. तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आईबाबांशिवाय अपूर्णच आहोत. म्हणून आईबाबांच्या प्रेमाचा धागा कधी तोडू नका. या जगात आपल्यावर निस्वार्थी भावनेने प्रेम करणारे फक्त आपले आईबाबा आहेत. वाढत्या वयासोबत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्या अधिकारांची जाण ठेवा आणि त्याचा योग्य उपयोग करायला शिका. आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय? हे अचूकपणे ठरवायला शिका. आयुष्यात हे सगळं जो तरूण शिकत असेल तो नक्कीच सज्ञानी होतोय.
या वयात कोणी पण बोललेला प्रत्येक शब्द हा मनाला लागतो आणि खरंच आपण त्याचाच विचार करत बसतो. कधी कुठे अपयश मिळालं की सगळं संपलं असं वाटतं. पण दोस्तहो त्यावेळेस काहीच संपलेलं नसतं. ती आयुष्याची एक नवी सुरूवात असते. जेव्हा आपण हरू त्यानंतरच बहरू ना ?
जिंदगी की यही रीत है,
हार के बाद ही जीत है |

Related posts

युवा महिलाओं के लिए प्रेरणा बन गई खुशबू सांघवी

Bundeli Khabar

महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति झाल्या बद्दल डॉ. मनीलाल शिंपी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Bundeli Khabar

केबल चोरी के आरपी को 24 घंटे के भीतर आपीएफ के के9 सदस्य ट्रैकर राणा स्वान (डॉग) कि मदत लगा पता।

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!