बापगांव देवरुंग येथील १४ जर्षि गायींचा मृत्यू ;
पशुपालक हरिश्चंद्र केणेंच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ
किशोर पाटील
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील बापगांव देवरूंग ग्रामपंचायत हद्दीतील पशुपालक हरिश्चंद्र केणे यांच्या गोठ्यात एकूण 22 जर्षी गायी पैकी 11 गायी सह तीन वासरांना आपला जीव गमवावा लागला तर बाकी 8 जर्षी गायीना सुद्धा संसर्गजन्य रोगाची लागण झाली. या गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त विजय धुमाळ,
पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. मृत पावलेल्या जर्षि गायी व वासरांचे शवविच्छेदन केले.मृत पावलेल्या जर्षि गायींचा अहवाल पुणे येथे पाठवण्यात आला असुन अहवाल आल्यानंतरच हा कोणत्या प्रकारचा रोग आहे व त्याचे निदान काय हे स्पष्ट होऊ शकेल असे मत उपायुक्त विजय धुमाळ यांनी व्यक्त केले.यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी घटनेची पाहणी केली व पशु पालक हरिश्चद्र केणे यांची झालेल्या नुकसान भरपाई ही कधीच भरून येणार नाही, तरी सुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून व त्यांचा सल्ला घेऊन आर्थिक तरदूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.स्थानिक ग्रामपंचायत चे उपसरपंच बाळाराम गोडे यांनी देवरुंग व बापगांवात जनावरांना ग्रामपंचायत मार्फत मोफत लसीकरण केले जाईल, व हरिश्चंद्र केणे पशुपालक यांना ग्रामपंचायत च्या वतीने सहकार्य करण्याचे जाहीर केले.